अर्नाळा ग्रामपंचायतीत घोटाळा
By admin | Published: June 4, 2017 04:38 AM2017-06-04T04:38:51+5:302017-06-04T04:38:51+5:30
अर्नाळा किल्ला ग्रामपंचायीत शौचालये व घरकुले योजनेत घोटाळा झाला आहे. दहा लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी निधी देण्यात आला आहे. यातील सहांनी शौचालये बांधलीच
- शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : अर्नाळा किल्ला ग्रामपंचायीत शौचालये व घरकुले योजनेत घोटाळा झाला आहे. दहा लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी निधी देण्यात आला आहे. यातील सहांनी शौचालये बांधलीच नाहीत. तर दारिद्रयरेषेखाली असल्याचे दाखवून २१ जणांना घरकुलांचे पैसे वाटल्याचे दाखविण्यात आले असले तरी १६ घरकुले बांधलीच गेलेली नसल्याने लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे.
निर्मल भारत अभियानांतर्गत १६ आॅगस्ट २०१४ रोजी १० लाभार्थींची शौचालये बांधण्यासाठी ४६ हजार रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. पण, त्यांना लाभ दिल्याची ग्रामपंचायतीच्या कॅशबुकमध्ये नोंदच झालेली नाही, असा ठपका चौकशीत ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०१४ रोजी ८७ हजार ४०० रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना ही रक्कम वाटण्यात आल्याची नोंदच कॅशबुकामध्ये करण्यात आलेली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ११ लाभार्थ्यांना अनुदान दिल्याचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्ष एकही शौचालय बांधण्यात आले नसल्याचे चौकशीत उजेडात आले. २२ मार्च २०११ रोजी ८८ हजार रुपये अनुदान दिल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, सदर अनुदान घेतलेल्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधले नसल्याचेही उजेडात आले आहे. २५ मार्च २०११ ते १९ मे २०११ पर्यंत सरपंच आणि ग्रामसेविकेने लाभार्थ्यांच्या नावाखाली ७९ हजार २०० रुपये खात्यातून काढले होते. प्रत्यक्षात ती लाभार्थ्यांना दिल्याची दप्तरी नोंद नसल्याने त्यांचा अपहार झाल्याचा ठपका निधी चौधरी यांनी आपल्या अहवालात ठेवला आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत १४ लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले आहेत. त्यापैकी सहा लाभार्थ्यांनी शौचालय बांधलेले नाही तर चार लाभार्थ्यांची शौचालये अपूर्ण आहेत. या लाभार्थ्यांसाठी ग्रामसेविका मधुरा निकम यांनी एकट्याच्या सहीनेच पैसे बँकेतून काढले आहेत. त्यामुळे सरकारी पैशांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत मु्ख्य कार्यकारी निधी चौधरी यांनी ग्रामसेविका निकम यांना १९ डिसेंबर २०१६ रोजी निलंबित केले.
धक्कादायक बाब म्हणजे शौचालय बांधण्यासाठी एकाच कुुटुंबात एकापेक्षा अधिक लोकांना लाभार्थी दाखवून पैसे दिल्याचे दाखवण्यात आले आहे. उपसरपंच विजय मेहेर यांच्या घरात शौचालय नाही. त्यांचा मुलगा सलील विजय मेहेर यांनी लाभार्थी म्हणून अनुदान घेतल्यानंतरही शौचालय बांधलेले नाही. ग्रामपंचायत सदस्या कांता अमृत म्हात्रे त्यांचे पती अमृत पंढरीनाथ म्हात्रे आणि सासरे पंढरीनाथ मगळ््या म्हात्रे यांना शौचालयासाठी अनुदान दिले आहे. त्यामुळे सरपंच भारती वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि सदस्या कांता म्हात्रे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९ अन्वये पदावरून दूर करण्याचा अहवाल जिल्हा परिषदेने १६ डिसेंबर २०१६ रोजी कोकण आयुक्तांकडे पाठवला आहे.
संतोष जयराम पागधरे, आनंद जयराम पागधरे, महेश जयराम पागधरे या तीन सख्या भावांना शौचालयाचे अनुदान देण़्यात आले आहे. चंद्रकला कौतीक तांडेल, कौतिक यशवंत तांडेल, कौतिक यशवंत तांडेल या पती-पत्नीला शौचालयासाठी अनुदान दिले गेले आहे. वासंती सुनील तांडेल आणि सुनिल भालचंद्र तांडेल या पती-पत्नीला शौचालयासाठी अनुदान दिले गेले आहे. रोहिणी नरेश मेहेर आणि त्यांचा मुलगा जिग्नेश नरेश मेहेर, नितीन जगदीश मेहेर आणि त्यांचा भाऊ यज्ञेश जगदीश मेहेर, आकाश राजेश म्हात्रे यांना दोनवेळा, भरत दत्तात्रेय राऊत आणि त्यांचे भाऊ अनंत राऊत, देवेंद्र रघुनाथ वैती आणि त्यांचा भाऊ रमाकांत रघुनाथ वैती यांना शौचालयासाठी अनुदान दिल्याचे दाखवण्यात आले आहे.
यापद्धतीने घरकुल वाटपातही मोठा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे. दारिद्र्यरेषेखालील २१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र १६ बनावट लाभार्थी दाखवून पैसे हडपण्यात आल्याचे उजेडात आले आहे. रमाबाई हरी म्हात्रे आणि त्यांचा मुलगा वासुदेव हरी म्हात्रे यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. दिपक भगवान धनू आणि भगवान जैतू धनू यांना घरकुल आणि शौचालयाचा लाभ देण्यात आला आहे. महादेव हरक्या म्हात्रे यांना दोनदा घरकुलाचे आणि एकदा शौचालयाचे अनुदान दिले गेले आहे. महेंद्र भास्कर तांडेल यांना दोनदा घरकुलाचा लाभ दिला गेला आहे. जर्नादन केशव मेहेर, पार्वती देवराम मेहेर, गजानन राघो आरेकर, कैलास प्रभाकर मेहेर, अमर महादेव मेहेर, रमेश कृष्णा धनू यांच्यासह त्यांचा भाऊ देवराज आणि रामराज यांना घरकुल आणि शौचालयाचा लाभ दिला गेला आहे.
घोटाळा दडपण्यात अधिकारी यशस्वी?
- पंचायत समितीमाच्या बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी केलेल्या चौकशीत अनेक घरकुले आणि शौचालये प्रत्यक्षात बांधली गेलेली नाहीत. तर बरीचशी अपूर्णावस्थेत असल्याचा अहवाल दिला होता.
मात्र, यात पंचायत समितीमधील एक बडा अधिकारी गुंतलेला असल्याने अहवाल आल्यानंतर चौकशी अधिकारी असलेल्या उप अभियंत्याचीच वसईतून बदली करण्यात आली.
त्यामुळे शौचालय घोटाळा चव्हाट्यावर आला असला तरी घरकुल घोटाळा दडपण्यात सध्यातरी पंचायत समितीमधील काही अधिकारी-कर्मचारी यशस्वी झाले आहेत, अशी चर्चा गावात तसेच संपूर्ण तालुक्यात सध्या सुरु आहे.