जात पंचायत प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी १६ जणांविरोधात केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:29 PM2023-11-08T21:29:07+5:302023-11-08T21:29:27+5:30
या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. जात पंचायतीच्या विरोधात जाणार्यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या चिखलडोंगरी गावातीला मांगेला समाजातील जात पंचायतीच्या १६ व इतर कमिटी सदस्यांच्या विरोधात अर्नाळा पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे लोक राहतात. या गावात आजही जात पंचायत अस्तित्वात आहे. जात पंचायतीच्या विरोधात जाणार्यांना २५ हजार ते १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जातो. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्ता देवस्थान वारकरी मंडळ ट्रस्ट बरोबर गावातील पंचायतीचा वाद आहे. त्यामुळे चिखलडोंगरी ग्रामस्थांना सासणेला जायला बंदी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगला केवल वैती यांचे विरारमधील चिखल डोंगरी हे त्यांचे मुळगाव असून मुरबाडच्या सासणे येथील निलेश जोशी यांना ते गुरू मानतात व त्यांचेकडे येणे जाणे आहे. मंगला यांचे गुरू निलेश जोशी व गावकरीचे पूर्वीपासून वाद आहेत. त्यामुळे जात पंचायतीने त्यांचेशी कोणीही संबंध ठेवू नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या व कुटुंबाचे घरी निलेश जोशी हे येत जात असल्याची माहिती झाली. त्यामुळे गावातील जात पंचायतीने त्यांचे कुटुंबाला ऑक्टोबर २०२१ पासून वाळीत टाकले व त्यांना २५ हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. त्यांनी दंड भरला नाही म्हणून त्यांना गावात येण्यापासून व चिखलडोंगरी गावात रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा चालवण्यापासून वंचित केले होते. तसेच मंगला यांच्या नातेवाईकांच्या मयताला येऊ दिले नाही. सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गावातील भारत पाटील, प्रकाश मेहेर, किरण मेहेर, मोतीराम वैती या चौघांनी मंगला यांच्या घरी येऊन त्यांना व त्यांच्या पतींना निलेश जोशी यांना गुरू मानणारा गावातील उमेश वैतीला घरी ठेवून घेतल्याचे संशयावरून शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली.
मंगला यांनी मंगळवारी रात्री तक्रार देऊन धनेश मेहेर, धनश्याम तांडेल, कौशल्या केशव राऊत, किरण भास्कर मेहेर, हितेश रामचंद्र मेहेर, भारत नारायण पाटील, राजेश रामचंद्र मेहेर, जगदीश काशिनाथ म्हात्रे, मनीष काशिनाथ म्हात्रे, किशोर नारायण पाटील, ईश्वर बबन वैती, प्रभाकर हरिश्चंद्र मेहेर, विशाल जगन्नाथ वैती, प्रकाश मेहेर, किरण नारायण मेहेर, मोतीराम दामोदर वैती व इतर जात पंचायत कमिटी सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.