लठ्ठ व्यक्तींच्या मृतदेहासाठी मोठ्या शवपेट्यांची सोय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:55 PM2018-05-30T19:55:15+5:302018-05-30T19:55:15+5:30
लठ्ठ व्यक्तीचा मृतदेह आल्यास बर्फाच्या लाद्यांमध्ये ठेवला जातो.
मीरारोड - स्थूल व्यक्तींचे प्रमाण वाढत असताना त्यांच्या मृत्यू पश्चात मृतदेह शवागारात ठेवायचा म्हटल्यास त्यांच्या आकाराची मोठी शव शीतपेटी नसल्याचे एका घटनेवरून समोर आले आहे . त्यामुळे महानगरपालिकेने शवगृहात मोठ्या क्षमतेच्या शव शीतपेट्यांची तात्काळ सोय करावी, अशी मागणी मीरा भाईंदर महापालिकेचे सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्याकडे केली आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या वाढतच आहे. पण एखाद्या लठ्ठ व्यक्तीचे निधन झाल्यास व त्याचा मृतदेह शवागार मध्ये ठेवायची वेळ आल्यास मोठ्या आकाराची शवपेटीच नसल्याने अडचण झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली .
भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानक समोर राहणारे नितीन पांडुरंग पाटील ( ५८) यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वजन सुमारे १६५ किलो इतके होते. रुग्णालयातून त्यांचा मृतदेह महापालिकेच्या टेम्बा येथील शवागारात ठेवण्यासाठी नेला होता. परंतु लठ्ठपणामुळे मृतदेह तेथील शवपेटीत जातच नव्हता. अखेर तेथील कर्मचाऱ्यांनी लठ्ठ व्यक्तीचा मृतदेह आल्यास बर्फाच्या लाद्यांमध्ये तो ठेवत असल्याचे सांगितले . अखेर बर्फाच्या लाद्या आणून त्यात मृतदेह ठेवण्यात आला . आज बुधवारी सकाळी तो घरी आणून अंत्यविधी उरकण्यात आले .
लठ्ठपणामुळे शवागारातील शीतपेटीत मृतदेह ठेवणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर रोहिदास पाटील यांनी सदर बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. महानगरपालिकेने तात्काळ मोठ्या क्षमतेच्या शव शीतपेट्यांची सोय करावी, अशी लेखी मागणी आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्याकडे त्यांनी केली आहे . आयुक्तांनी मागणी मान्य केल्याचे पाटील यांनी सांगितले.