मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दुकलीला अटक, २ गुन्ह्यांची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 07:48 PM2023-07-28T19:48:40+5:302023-07-28T19:49:16+5:30
नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेले मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले आहे.
२३ जुलैला रात्रीच्या वेळी पावणे बारा वाजता अहमदाबाद मुंबई हायवेवरील मुंबई वाहिनीवर बापाने ब्रीज संपताच भाईदरला जाण्याकरिता रिक्षा पकडण्याकरिता फिर्यादी आले होते. त्यावेळी नंबर नसलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील रेडमी कंपनीचा मोबाईल जबरीने खेचून पळून गेले. नायगांव पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने वरिष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने नायगाव गुन्हे प्रकटीकरण पथकांची पथके नेमण्यात आली होती. गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे बापानेतून आरोपी नसीर जहीर खान (२६) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने व सोबत तौफिक शेख याने मिळुन नायगाव व वालीव येथील दोन गुन्हे केल्याचे निषन्न झाल्यावर अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले मोबाईल, इतर मुद्देमाल व गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली दुचाकी असा ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलींद साबळे तसेच गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर, रोशन देवरे, पोलीस हवालदार देविदास पाटील, अशोक लहामटे, सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, अझर मस्ते, सोमीनाथ बोडके, मसुब चव्हाण यांनी केली आहे.