गावठी दारु गुत्यावर अटक केलेल्यांना अटक आणि दंड
By धीरज परब | Published: May 16, 2024 07:23 PM2024-05-16T19:23:57+5:302024-05-16T19:26:40+5:30
हातभट्टीची विक्री करणारा गुत्त्याचा मालक व ११ दारू पिणारे मद्यपी गिऱ्हाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भागातून एका गावठी दारू विक्रेत्यासह दारू पिणारे अश्या एकूण १२ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता विक्रेत्यास २५ हजार तर पिणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला.
ठाणे विभागात गावठी हातभट्या व हातभट्टीच्या दारूचे गुत्ते तसेच अवैध दारू विक्री, वाहतूक आदी विरोधात कारवाईसाठी शासनाचा राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. परंतु सदर विभागाकडून व्यापक आणि सातत्याने कारवाई होत नसल्याने स्थानिक पोलीस ठाण्यां कडून अवैध दारू विरुद्ध कारवाई करत गुन्हे दाखल केले जातात.
परंतु गेल्या काही दिवसात निवडणुकीच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागास जाग आल्याचे दिसत असून त्यांनी काही प्रमाणात कारवाई सुरु केल्याचे दिसू लागले आहे. उत्तन भागातील गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री केल्याच्या माहिती वरून उत्पादन शुल्क सी - विभागाचे निरीक्षक अशोक देसले, दुय्यम निरीक्षक रत्नाकर शिंदे व रमेश कोलते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना वारे, जवान प्रवीण नागरे, राजेश तारू, मधू राठोड यांच्या पथकाने १५ मे रोजी छापा टाकून ४५ लिटर हातभट्टीची दारू व अन्य असा मिळून सुमारे १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
हातभट्टीची विक्री करणारा गुत्त्याचा मालक व ११ दारू पिणारे मद्यपी गिऱ्हाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता हातभट्टी विक्रेत्यास २५ हजार रुपये दंड तर दारू पिणाऱ्या ११ गिऱ्हाईकाना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. पुढील अधिक तपास निरीक्षक अशोक देसले हे करीत आहेत.