कलेतून मिळाला जगण्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 01:33 AM2020-08-02T01:33:52+5:302020-08-02T01:34:04+5:30
बनी हिची मुलगी वैशाली कामडी ही केशवसृष्टीमधील बांबू हस्तकला समूहात काम करते. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नाही म्हणून लोक रोजगार हमीच्या कामावर गेली
विक्रमगड : तालुक्यातील उटावली गावातील बनी कामडी ही विधवा भूमिहीन व निराधार महिला असून घरची परिस्थिती खूपच गरिबीची आहे. तिची मुलगी वैशाली हिने बांबूपासून राखी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि तिच्या पहिल्या कमाईचे दहा हजार रुपये मिळाल्यामुळे या निराधार महिलांना जगण्याचा आधार मिळाला आहे.
बनी हिची मुलगी वैशाली कामडी ही केशवसृष्टीमधील बांबू हस्तकला समूहात काम करते. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नाही म्हणून लोक रोजगार हमीच्या कामावर गेली, परंतु वैशालीच्या आईने सांगितले की, तू बांबू प्रकल्पात जे काम शिकले तेच कर, तिला गावातील लोक हसायचे, टोमणे मारायचे, पण वैशालीने जिद्द सोडली नाही. एक महिन्याअगोदर बांबू राखीची खूप मोठी आॅर्डर मिळाली. त्यातून तिला दहा हजार रुपये मिळाले. ते देण्यासाठी कैलास कुरकुटे व गावकरी घरी गेले असता वैशालीच्या आईचे डोळे पाणावले. आपल्या मुलीची पहिली कमाई पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. केशवसृष्टीने मला व माझ्या कुटुंबाला जगण्याचा आधार मिळाला, असे ती म्हणाली. केशवसृष्टी ग्रामविकासचे संयोजक अरविंद मार्ढीकर, संतोष गायकवाड, आदींच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.