पालघर जिल्ह्यात टँकर लॉबीने केली कृत्रिम पाणीटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:36 PM2024-04-01T13:36:10+5:302024-04-01T13:37:25+5:30
Palghar News: निसर्गाचे वरदान लाभलेला पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी असे या जिल्ह्याचे स्वरूप आहे. जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. मात्र, तरीसुद्धा जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात.
- जगदीश भोवड
(मुख्य उपसंपादक)
निसर्गाचे वरदान लाभलेला पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी असे या जिल्ह्याचे स्वरूप आहे. जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. मात्र, तरीसुद्धा जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. जिल्ह्याच्या चार तालुक्यांत एव्हाना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांसह गुजरात राज्याच्या सीमेवरील हा जिल्हा एकीकडे विकासाच्या वाटेवर आहे. पालघर जिल्ह्यात बहुचर्चित बुलेट ट्रेन, मुंबई - बडोदा एक्स्प्रेस वे अशी विकासकामे सध्या सुरू आहेत. वाढवण बंदरासारखा मोठा प्रकल्पसुद्धा जिल्ह्यात येऊ घातला आहे. पूर्वी ठाणे जिल्ह्याचा भाग असलेला पालघर दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र जिल्हा झाला. मात्र, जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतरही जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न आजही आ वासून उभे आहेत. आदिवासींसह स्थानिकांचे प्रश्न अद्याप जैसे थे आहेत.
पालघर जिल्ह्यात सूर्या प्रकल्पासह काही महत्त्वाची धरणेही आहेत. या जिल्ह्यातून मुंबईसह वसई - विरार, मीरा - भाईंदर या भागांना पाणीपुरवठा केला जातो, मात्र खुद्द पालघर जिल्ह्यातील नागरिकांचा घसा कोरडाच असल्याचीही स्थिती आहे. यावरून ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ असेही बोलले जात आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, मोखाडा आणि जव्हार या चार तालुक्यांतील काही गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. हे चारही तालुके आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील आहेत. दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे आजही दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या पाचवीला पाणीटंचाई पुजलेली असल्याचे चित्र आहे.
पालघरमधील जव्हार तालुक्याला प्रतिमहाबळेश्वर मानले जाते. मात्र, या तालुक्यातील काही गावांत मार्च महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भागांत जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक कामे अनेक कारणांनी अपूर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रात्री-बेरात्री अंधारात बोअरिंगवर रांग लावण्याचीही वेळ आलेली आहे. यामुळे संबंधित गावांनी स्थानिक प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. दुर्गम आदिवासी डोंगराळ भाग असलेल्या अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असल्याचेही दृश्य दिसून येत आहे.
पावसाचे प्रमाण किती?
पालघर जिल्ह्यात यावर्षी एकूण २२६०.०१ मिलिमीटर पाऊस पडला होता. ११३.८ टक्के इतके हे प्रमाण आहे. असे असतानाही पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यांत सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. ६ गावे आणि ३६ पाड्यांत सध्या १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागांत पाणीटंचाईवर अद्याप मात का केली जात नाही, असाही सवाल केला जात आहे. टँकर लाॅबीला पोसण्यासाठी हे सर्व केले जात आहे का, असाही आरोप होत आहे. टँकरवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात.