किमयागाराला कलात्मक श्रद्धांजली, आर्टिस्टने चितारला अटलजींचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 03:32 PM2018-08-17T15:32:56+5:302018-08-17T15:44:58+5:30
भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर देशभर दुखवटा पाळला जात आहे. विविध ठिकाणी नागरिकांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय आर्टिस्टने
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर देशभर दुखवटा पाळला जात आहे. विविध ठिकाणी नागरिकांकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. डहाणूतील दिलीप पटेल या सत्तावीस वर्षीय आर्टिस्टने अटलजींचे टॅटू चितारून, कलेच्या माध्यमातून आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. तालुक्याच्या राई गावातील टॅटू आर्टिस्ट दिलीप पटेल यांनी हार्दिक कडू या 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणांच्या पाठीवर हा टॅटू गोंदवला आहे.
भारताच्या तिरंग्यावर आर्टीस्ट दिलीप यांनी अटलजींची प्रतिकृती चितारली आहे. त्यांच्या कुंचल्यातून चेहऱ्यावरील भाव इतके प्रभावीपणे व्यक्त झाले आहेत, कि त्यामुळे ही कलाकृती बोलकी वाटते. हा टॅटू काढण्याकरिता त्याला चार तासांचा अवधी लागला. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता टॅटूला प्रारंभ करण्यात आला, दुपारी एकच्या सुमारास ही कलाकृती पूर्णत्वास आली. एकूण टॅटूची लांबी 16 बाय दहा इंच असून 7 बाय 5 इंच चेहऱ्याची प्रतिमा आहे. याकरिता ऍक्रोलीक इकोफ्रेंडली रंग वापरण्यात आले आहेत. स्वर्गीय माजी पंतप्रधानांविषयी शालेय वयात जे ऐकले, त्या जाणिवेतून तब्बल चारतास एका जागी न हलता बसता आले, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे 16 वर्षीय हार्दिक कडू याने लोकमतशी बोलताना सांगितले. तर विज्ञाननिष्ठ आणि देशप्रेमी अटलजींना आपल्या कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्याचा विचार त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर मनात आला. त्यानंतरच हे टॅटू आकाराला आल्याचे आर्टिस्ट दिलीप पटेल यांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ -