‘किखन तेला’साठी प्रसिद्ध आसनगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 02:26 PM2023-08-13T14:26:56+5:302023-08-13T14:28:33+5:30
‘किखन तेल’ आणि ‘मितना माच्छी’ समाज ही ओळख बनली आहे.
- अनिरुद्ध पाटील
पालघर जिल्ह्याला सव्वाशे किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या पट्ट्यात खाडी आणि खाजण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कांदळवन पसरले आहे. कांदळवन वनस्पतींच्या विविध जातींचा समावेश असून, मासेमारी, खेकडापालन, मधुमक्षिका पालन, तसेच अन्य रोजगाराच्या संधी या वनांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.
डहाणू तालुक्यातील वाणगावनजीकच्या आसनगाव आणि परिसरातील ‘मितना माच्छी’ जमातीच्या लोकांना पूर्वजांनी या कांदळवनातील ‘किखन’ या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीच्या फळांपासून औषधी तेल बनविण्याची कला शिकवली. हे ‘किखन तेल’ खूपच प्रसिद्ध असून आजीबाईच्या बटव्यात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा तुपासारखा दिसणारा पदार्थ दुर्मीळ असून त्याचे औषधी गुणधर्म विविध रोगांवर रामबाण उपाय ठरतात. त्यामुळेच ‘किखन तेल’ आणि ‘मितना माच्छी’ समाज ही ओळख बनली आहे.
डहाणू तालुक्यातील आसनगाव, सावटा, माडगाव मितना माच्छी समाजातील हा महिलाप्रधान व्यवसाय आहे. या ‘किखन’ला मराठीत त्याला ‘काखन’ असे नाव आहे. या वनस्पतीला पिलू, जाल आणि मिसवाक असेही संबोधले जाते. या वनस्पतीचे बॉटनिकल नाव साल्वाडारा परसिका आणि संस्कृतात सार किंवा अर्क म्हणून संबोधले जाते. मूत्रपिंड, तसेच दात व हिरड्यांच्या आजारावर ही वनस्पती गुणकारी असून, विषाणूजन्य आजार, पोटदुखी, सूज, संधिवात यांवर वेदनाक्षम म्हणून वापर होतो.
- किखनाच्या झाडांना हिवाळ्यात फुले येऊन हिरव्या रंगांची बोराच्या आकाराची फळे येतात.
- एप्रिल ते मे महिन्यात ही फळे पक्व झाल्यावर त्यांना चेरी फळांसारखा लालसर रंग येतो. त्यांची चव थोडीशी तिखट असते.
- पक्व फळे उन्हात सुकवली जातात. योग्य ऊन दिल्यावर या फळांना जात्यामध्ये भरडून डाळ काढली जाते.
- ही डाळ तुरीच्या डाळीसारखी दिसते. डाळीला तेलाच्या घाणीत टाकून त्या फळांचे तेल काढले जाते. हे तेल काढण्यासाठी पूर्वी डहाणू गावातल्या तेल घाण्यात जावे लागायचे.
- तेल नंतर वातावरणाशी संपर्कात येऊन हळूहळू गोठून पिवळट तुपाप्रमाणे होते. मलमाप्रमाणे दिसत असले तरी त्याला ‘किखन तेल’ असे म्हटले जाते. हे तेल खूपच औषधी गुणधर्मयुक्त असते.