आश्रमशाळा की विद्यार्थ्यांच्या छळछावण्या? - विवेक पंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:05 AM2020-01-24T00:05:50+5:302020-01-24T00:07:37+5:30
आश्रमशाळांत दिवसेंदिवस आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत, असा प्रश्न पडला आहे.
- रवींद्र साळवे
मोखाडा : आश्रमशाळांत दिवसेंदिवस आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत, असा प्रश्न पडला आहे. मोखाडा तालुक्यातील हिरवे पिंपळपाडा येथील एका १५ वर्षांच्या विद्यार्थ्याने नुकतीच आत्महत्या केल्याच्या संशयास्पद घटनेनंतर पुन्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आश्रमशाळेतील प्रत्येक मृत्यू हा पोलीस कोठडीतील मृत्यू असे गृहीत धरून राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. घटनांबाबत खुनाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय कोवळ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांना कळणार नाही, असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पंडित यांनी केली आहे.
जिल्ह्यातील मोखाडामधील हिरवे पिंपळपाडा आश्रमशाळेत नववीत शिकणाºया सुनील चंदर खांडवी या १५ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पण सुनीलचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. जांभूळमाथा येथे राहणाºया सुनीलचा मृतदेह मुलींच्या बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. ही घटना रविवारी घडली होती.
यापूर्वीही अशा अनेक घटना घडून देखील याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही अथवा उपाययोजनेचे ठोस धोरणही राबवले गेले नाही. विवेक पंडित म्हणाले की, आश्रमशाळा विद्यार्थी हे अधीक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्या ताब्यात म्हणजेच कायद्याच्या भाषेत कोठडीत असतात. त्यामुळे अशा घटना घडतात तेव्हा कोठडीतील मृत्यूबाबत मानवी हक्क आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्याचप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. मृत्यू झाल्यास २४ तासाच्या आत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला माहिती देण्यात यावी. तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष प्रत्यक्ष जागेवर प्रेताचा पंचनामा केला जावा. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रेताचे शवविच्छेदन करावे. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते मानवी हक्क आयोगाला पाठविण्यात यावे आणि हे मृत्यू केवळ अनैसर्गिक मृत्यू न समजता हे कोठडीतील मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू समजून मुख्याध्यापक, अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांच्या लेखी काय आहे?
मागील तीन वर्षांत शासकीय आश्रमशाळांमध्ये झालेल्या २८२ मृत्यूंची चिकित्सा केली. यात २८ टक्के मुलांच्या मृत्यूचे कारणच समजू शकले नाही असे त्यांनी नमूद केले आहे. २३ टक्के मुलांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला, तर १२.६१ टक्के मुलांचा अचानक मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.
४.९२ टक्के विद्यार्थ्यांचा साप चावून मृत्यू झाला असून ४.२९ टक्के मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते. सर्वत्र ही अशी भयावह परिस्थिती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांच्या लेखी काय आहे? असा संतप्त सवाल पंडित यांनी केला. तातडीने याबाबत धोरण बनवावे, अशी मागणी या वेळी पंडित यांनी केली
वेगवेगळ्या कारणांनी १४१६ विद्यार्थ्यांचे मृत्यू : राज्यात ५२९ शासकीय आश्रमशाळा असून त्यात सुमारे एक लाख ९१ हजार ५६१ विद्यार्थी आहेत, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख ५३ हजार ८९१ विद्यार्थी आहेत. यामध्ये मुलींची संख्या निम्मी असून २००३ पासून २०१६ पर्यंत या आश्रमशाळांमधील १४१६ विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, आत्महत्येसह विविध कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात ८ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.