ट्रस्टच्या विदेशी संचालिकेला मारहाण, खंडणीची धमकी
By admin | Published: January 22, 2017 02:53 AM2017-01-22T02:53:27+5:302017-01-22T02:53:27+5:30
या तालुक्यातील निबंवली येथे श्री नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट असून त्यात नोकरीस असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी संस्थेविरोधात वर्तन केल्याने त्यांना कामावरून का कमी करू नये याबाबतची
वाडा : या तालुक्यातील निबंवली येथे श्री नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट असून त्यात नोकरीस असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी संस्थेविरोधात वर्तन केल्याने त्यांना कामावरून का कमी करू नये याबाबतची विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी संस्थेवर मोर्चा काढून मारझोड करण्याची धमकी देऊन भरपाई म्हणून पैशाची मागणी केली असल्याची तक्रार संस्थेच्या सचिवांनी वाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या संस्थेत ६० ते ७० महिला कामाला आहेत. आदिवासी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात आहे. या संस्थेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविल्या जातात. यामध्ये बॅगा, पायपुसण्या, उशी कव्हर, मोबाईल पाऊच, शो पीस, तयार केल्या जातात. येथील महिला हे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या संस्थेला एक परदेशी महिला आर्थिक मदत करत असते.
या संस्थेत संदीप ठाकरे, हर्षला जाधव व भावना घाटाळ हे तीन कर्मचारी नोकरी करतात. या तिघांनी एक आवाज या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील झडिके येथे ३ जानेवारी रोजी सावित्री बाई फुले साजरी केली होती. मात्र याच दिवशी या संस्थेने आयोजिलेल्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या सोहळ््यात ते सहभागी झाले नाही. तसेच त्याच्या आयोजनात त्यांनी सहकार्यदेखील केले नाही. उलट रजा घेऊन ते अन्य संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यामुळे तुमच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा केली असता संदीप ठाकरे या कर्मचाऱ्यांने संस्थेच्या संचालिका जेनेटा मोनोसा यांना दूरध्वनी करून संस्थेवर मोर्चा काढून तुम्हाला मारझोड करू असे धमकावले व भरपाई म्हणून पंधरा लाखांची मागणी केली. अशी तक्रार संस्थेच्या सचिव गंगाताई गरेल यांनी पोलिसात दाखल केली आहे. याबाबत या तिघा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)