वनरक्षकांवर हल्ला; तीन तस्कराना अटक
By admin | Published: September 27, 2016 03:46 AM2016-09-27T03:46:34+5:302016-09-27T03:46:34+5:30
विरार जवळील जंगलात जून महिन्यात वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत
वसई : विरार जवळील जंगलात जून महिन्यात वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत दिसलेल्या टेम्पोच्या वर्णनावरून पोलिसांनी ही कारवाई केली. याआधी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. अद्याप ६ जण फरार आहेत.
दहा जूनच्या पहाटे साडेचारच्या सुमारास हि घटना घडली होती. तस्करांची टोळी जंगलात वृक्षतोडीसाठी आणि शिकारीसाठी येणार असल्याची माहिती वसई वनविभागाला मिळाली होती. तीन वनवरक्षकांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी जंगलात निघाले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास पाचरूखे जंगलात गस्त घालत असतांना टेम्पोतून आलेल्या दहाबारा तस्करांनी वनरक्षकांना कोंडीत पकडून दगडांनी हल्ला करून ते फरार झाले होते. या हल्ल्यात वनरक्षक एन.बी. दळवी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला ३४ टाके पडून हात फ्रॅक्चर झाला होता. या हल्ल्यात इतर कर्मचाऱ्यांनी आपला जीव कसाबसा वाचविला होता.
तस्कर टेम्पोतून पळून जात असतांना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज विरार पोलिसांना सापडले होते. त्या आधारे त्यांचा शोध सुरू होता. याच तस्करांची टोळी महामार्गावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून हा टेम्पो ताब्यात घेऊन बाळकृष्ण भावर, आसिब मुल्ला व लक्ष्मण गुलुम या तिघांना अटक केली. या टोळीतील दोन तस्करांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीत टेम्पो दिसला असेल म्हणून या तस्करांनी टेम्पोची नंबर प्लेट बदलली होती तसेच टेम्पोचा रंग बदलला होता अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख यांनी दिली.