पालघरच्या पोलीस अधीक्षकांवर हल्ला; रेती व्यावसायिकांची मुजोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 03:00 AM2019-11-19T03:00:17+5:302019-11-19T03:00:24+5:30
उत्खनन करणाऱ्या रेतीचोरांवर अधीक्षकांची धाडसी कारवाई
नालासोपारा : विरार पूर्वेकडील खाडी समुद्र किनारी रात्री रेती उत्खनन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे विरार पोलिसांना कल्पना न देता ते स्वत: बॉडीगार्ड आणि चालकासह सदर ठिकाणी पोहोचले आणि रेती व्यावसायिकांवर धाड घातली. मात्र, यातील एका ट्रक चालकाने त्यांच्यावर तसेच त्यांच्या गाडीवर ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर विरार पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांचा फौजफाटा बघितल्यावर रेतीचे अनेक ट्रक पळून गेले. तरी पोलिसांनी दोन ते तीन रेतीचे ट्रक पकडले असून १५ जेसीबी सुद्धा जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील खाडी या समुद्रकिनारी रात्री बिनधास्तपणे रेती उत्खनन होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मिळाल्यावर ते स्वत: अंगरक्षक व चालक घेऊन तेथे रात्री पावणेबाराच्या सुमारास पोहोचले. त्यांना पाहिल्यावर रेती चोरांची धावपळ झाली. अंगरक्षकाने रेतीचा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न करताच एका ट्रक चालकाने त्यांच्यावर आणि अधीक्षकांच्या गाडीवर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.
विरार पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिल्यावर ते घटनास्थळी पोहचले. या घटनेत एकाला पकडल्याचे सूत्रांकडून कळते. या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे.