तोडकाम पथकावर पुन्हा हल्ला
By admin | Published: June 23, 2016 02:47 AM2016-06-23T02:47:53+5:302016-06-23T02:47:53+5:30
गोखीवरे येथील अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला चढवून सहा कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
वसई : गोखीवरे येथील अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला चढवून सहा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हल्ल्यानंतर पालिकेने कारवाई गुंडाळून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तर अनधिकृत बांधकामांविरुद्धची कारवाई जारी ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
दर बुधवारी पालिकेकडून एका विभागात अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहिम हाती घेण्यात येते. यावेळी गोखीवरे परिसरात ही मोहिम सुरु होती. येथील गावठाणात स्थानिकांनी काही बिल्डर्स हाताशी धरून मोठ्या इमारती बांधल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पालिकेचे उपायुक्त किशोर गवस यांच नेतृत्वाखाली सर्व सहाय्यक आयुक्त आणि कर्मचारी कारवाई करीत होते. चार मजली दोन आणि पाच मजली एका इमारतीवर कारवाई झाल्यानंतर मोठा जमाव आडवा आला.
या जमावाने थेट पालिकेच्या पथकावरच हल्ला चढवला. पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांनी पोकलेनच्या ड्रायव्हरसह सहा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. कारवाई मागे घेतल्यानंतरच जमाव शांत झाला.
पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले. तसेच वालीव पोलीस ठाण्यात काही लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. याठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करू अशी हमी बिल्डरांकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांनी संबंधित बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहाय्क आयुक्तांना यावेळी दिले. आजच्या कारवाईत तुंगारेश्वर येथील तीन व सातीवली येथील चार इमारतींवर कारवाई करणत आली. मात्र, गोखीवरे येथील हल्ल्यानंतर कारवाई अर्धवट सोडून देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)