बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती, रॅली, पथनाट्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 10:48 PM2019-11-08T22:48:06+5:302019-11-08T22:48:33+5:30
महिनाभर चालणार मोहीम : रॅली, पथनाट्याचे आयोजन
बोईसर : बाल कामगार प्रथेविरुद्ध ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहीमेमध्ये मालक तसेच चालकांकडून बाल कामगार न ठेवण्याबाबतचे हमीपत्र घेणयाबरोबर विविध कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन, सर्व व्यवसायातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालक संघटनांची बैठक घेऊन सुधारित बाल कामगार अधिनियमाची माहिती देण्यात येणार असून रॅली तसेच पथनाट्याचे आयोजन केले आहे. पत्रके वाटून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घरेलू कामगार म्हणून बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत आवाहन करणे आदी जनजागृतीचे कार्यक्रम राबवायचे आहेत. या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यासंबंधात कामगार आयुक्त कार्यालयाने तहसीलदार रेवननाथ लबडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कामगार उपायुक्त कि.वि. दहिफळकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, राजेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मोक्षदा माशाळकर, जिल्हा बालसंरक्षण, विलास पिंपळे, उपशिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) जि.प. पालघर, डॉ. अजय ठाकरे, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. पालघर, संकेत कानडे, सदस्य सचिव तथा सहा. कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त कार्यालय, पालघर, राजेंद्र चव्हाण, सरकारी कामगार अधिकारी, कामगार उपायुक्त कार्यालय, पालघर व अरविंद नाईक, वसई विरार शहर मनपा आदी उपस्थित होते. शासन निर्णय २ मार्च २००९ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना केली असून यामध्ये विविध विभागांच्या अधिकाºयांचा तसेच अशासकीय सदस्यांचा समावेश आहे.
जनजागृतीसोबत धाडसत्रही राबवणार
बालकामगार ही अनिष्ट प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक निकषाशी निगडीत असल्याने या प्रथेविरु द्ध विस्तृतपणे जनजागृती होणे आवश्यक असल्याने कामगार आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार मोहीम राबविणेबाबत तसेच धाडसत्राचे आयोजन करण्याबाबत सूचित करून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाल्याचे कृतीदल प्रमुखांच्यावतीने तहसीलदार रेवननाथ लबडे यांनी घोषित केले.