ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:23 PM2019-12-26T23:23:01+5:302019-12-26T23:23:34+5:30
आ. श्रीनिवास वनगा : राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्र म उत्साहात
बोईसर : वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांची सर्वत्र होणारी फसवणूक टाळण्यासाठी जनजागृतीची अत्यंत गरज आहे, असे मत पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले. अखिल उपभोक्ता सहयोग फाऊंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्र मात बोईसर येथे ते बोलत होते.
तारापूर एमआयडीसीतील टिमा सभागृहात मंगळवारी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक जनजागृती संमेलन पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे आमदार वनगा, विशेष अतिथी पालघर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल उपभोक्ता सहयोग फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ पाटील होते. वणगा यांनी सामान्यातील सामान्य माणसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच भारताचे राष्ट्रपती या मोठ्या व्यक्तीही ग्राहकच आहेत, असे सांगितले. काळे यांनी ग्राहकांची होणारी फसगत टाळावी म्हणून जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त करत ग्राहकांनीही अतिशय सावधपणे खरेदी करावी, असे आवाहन केले.
अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आॅनलाईन आणि वेगवेगळ्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक होत असेल तर त्यांनी फाऊंडेशनकडे तक्रार करावी. संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यात ग्राहकांच्या फसवणुकीबद्दल अनेक ठिकाणी दंड ठोठावण्यात आला आहे, असे सांगून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या संमेलनात ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन पाटील यांनी मार्गदर्शन केले. या संमेलनास फूड अॅण्ड ड्रग्सचे गौरांग जगताप, उत्तराखंडचे अध्यक्ष जोगा सिंग, मुंबईच्या प्रमुख शशिकला पांडे, अखिल उपभोक्ता सहयोग फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष नीलेश भोईर, महासचिव संतोष राणे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल पत्रकार प्रमोद पाटील, संतोष पाटील, उद्योजक राजाभाई एडवणकर, व्यावसायिक मुकेश राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.