बिबट्याच्या सुरक्षेसाठी मार्गावर जनजागृती फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:40 PM2019-11-29T23:40:38+5:302019-11-29T23:41:11+5:30
डहाणू उपवन संरक्षण विभागातील कासा, मनोर, उधवा आणि बोर्डी या चार वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत जंगलात बिबट्याचा वावर आहे.
डहाणू/बोर्डी : डहाणू उपवन संरक्षण विभागातील कासा, मनोर, उधवा आणि बोर्डी या चार वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत जंगलात बिबट्याचा वावर आहे. तेथून जिल्हा मार्ग तसेच राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जात असून तो ओलांडताना वन्यजीवाला धोका पोहोचू नये याबाबत वाहन चालकांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे, याकरिता या विभागाने जनजागृती फलक लावले आहेत. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
पालघर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून त्या वन्यजीवांनी समृद्ध आहेत. डहाणू उपवन संरक्षण कार्यालयांतर्गत दहा वनपरिक्षेत्र कार्यालये असून त्यापैकी अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. या विविध भागातील जंगलातून जिल्हा प्रमुख मार्ग, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातो. बिबट्या हा निशाचर प्राणी असून अंधारात तो भक्ष्याच्या शोधात जंगलातून मानवी वस्तीकडे जातो. सूर्यास्तानंतर ते पहाटेच्या सुमारास भटकंती दरम्यान वाहनाच्या धडकेत त्याला अपघात होऊन तो जबर जखमी किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडू शकतात. यापूर्वी २०१० मध्ये मेंढवणला तर २०१८ मध्ये उधवा रेंजमधील धानिवरे आणि बोर्डी रेंजच्या अच्छाडनजीक उपलाट येथे मार्ग ओलांडताना बिबट्या जखमी वा मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, नजीकच्या काळात कासा रेंजमधील महालक्ष्मी व रानशेत गावांमध्ये मनोर रेंजमधील मेंढवण भागात, उधवा रेंजमधील धानिवरे आणि बोर्डी रेजअंतर्गत बोरिगाव येथे बिबट्याचा वावर वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यू.सी.ए.डब्ल्यू.ए.) या वन्यजीव संस्थेला आढळून आला. त्यानंतर या संस्थेकडून वन विभागाला याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केल्याची माहिती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक धवल कंसारा यांनी दिली. तर एकही जीव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी वा मृत्यूमुखी पडू नये याकरिता डहाणू उपवन संरक्षक विजय भिसे यांनी जंगलातून जाणाऱ्या अशा मार्गावर वाहन चालकांना सूचना देणारे फलक मार्गालगत लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टप्प्या-टप्प्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ येथील महालक्ष्मीनजीक, मनोरच्या मेंढवण येथे असे फलक लावले. त्यानंतर बोर्डीनजीकच्या बोरीगाव घाटातील कोशीम खिंडीत असा बोर्ड नुकताच लावण्यात आला.
वन्य जीवांच्या धडकेने शारीरिक दुखापत, जीव गमविणे, वाहनांचे नुकसान अशा प्रसंगांना तोंड देण्यापेक्षा या फलकाच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा मिळत असल्याचे चालक सांगत असल्याचे डब्ल्यू.सी.ए.डब्ल्यू.ए. या संस्थेचे सदस्य रेमंड डिसोझा यांनी सांगितले.
बिबट्या मार्ग का ओलांडतो?
बिबट्या रात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधात जंगलाकडून मानवी वस्तीकडे येतो. महामार्गावर टाकण्यात येणारा कचरा वा शिळे अन्नपदार्थ खाण्याकरिता कुत्रे वा वन्य श्वापदे यांच्या शिकारीकरिता, महामार्गामुळे जंगलाचे विभाजन झाल्याने एका भागातून दुस-या दिशेने जाताना.
‘‘फॉरेस्ट कोरिडोर, महामार्ग आदि भागात ठिकठिकाणी पूल, नाले या पद्धतीचे मार्ग वन्य जीवांकरिता करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना पर्यायीमार्ग न मिळाल्यास रस्ता ओलांडताना त्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच संभाव्य धोका लक्षात घेता अशा उपाययोजना आखणे आवश्यक आहेत.’’
- धवल कंसारा (पालघर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक)
‘‘कासा, मनोर, उधवा आणि बोर्डी या वनपरिक्षेत्रातील जंगलात बिबट्याचा वावर आढळला. त्या जंगलातून जिल्हा मार्ग, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे तेथून जाताना वाहन चालकांनी विशेष काळजी घेऊन स्वत:प्रमाणे प्राण्यांच्याही जीवाचे रक्षण करावे, या हेतूने जनजागृती करणारे फलक लावले आहेत.’’
- विजय भिसे (उपवन संरक्षक, डहाणू)