बाळकापरा गावाला डेंग्यूचा विळखा, जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 06:39 AM2017-11-28T06:39:59+5:302017-11-28T06:39:59+5:30
बाळकापरा गावात डेंग्यूची साथ पसरली असून बाधा झालेले गावातील २१ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीमध्ये तिघांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
जव्हार : तालुक्यातील बाळकापरा गावात डेंग्यूची साथ पसरली असून बाधा झालेले गावातील २१ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणीमध्ये तिघांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात १३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या आजाराविषयी माहिती नसल्याने गावकरी दहशतीखाली आहेत.
तालुक्यापासून अगदी १० कि.मी. अंतरावर असलेल्या बाळकापरा गावात गत आठवड्यापासून डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यातच मलेरिया आणि टाईफाईडचे रुग्णही आढळले आहेत. गावात १४० कुटुंब राहत असून, गत काही दिवसांपासून येथे हिवतापाचे रुग्णही आढळले आहेत. ज्या रुग्णांना ताप येतो त्या संशयित रुग्णावर प्राथमिक उपचार करून लगेच जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येत आहे. गावातील १८ रुग्ण जव्हारच्या ग्रामीण रुग्णलयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बाळकापरा गावात साथीमुळे ताप येणे, गुढग्याचा सांधा दुखणे, डोके दु:खी, हातपाय चावणे, हिवतापामुळे थंडी भरणे अशी लक्षणे रुणांमध्ये दिसत आहेत. त्यातच या गावामध्ये आरोग्ययंत्रणेच्या मलेरिया विभागाच्या कर्मचाºयांनी आणि तालुका आरोग्य यंत्रणेच्या स्वयंसेवकांनी गावात ठाण मांडून जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.
गावातील ९ रुग्णांचे रक्ताचे नमुने डहाणू येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी गोविंद पांडुरंग गाडगे (६०), भाऊ गोविंद गडगे (३५), द्वारकी काशिनाथ तुंबडा (६५) यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य यंत्रणांनी गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी जव्हार कुटीर रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असल्यांचे डॉक्टरांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. दरम्यान डॉक्टरांनी विहिरीचे पाणी स्वच्छ असल्याचा प्राथमिक निर्वाळा दिला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेकडून गावात सर्वत्र साठविलेल्या पाण्याची पाहणी ते रिकामे करण्याचे निर्देश गावकºयांना दिले आहेत.
गावात फॉगिंग मशीनने फवारणी करावी असे ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. बाळकापरा गावातील अनेक जण रोजगारासाठी भिवंडी, ठाणे, खारबाव, या ठिकाणी स्थलांतरीत झाले होते. ते मजूर गावात आले. मात्र ते मजूर आजारी होते. त्या रुग्णांमुळे डेंग्यूची साथ गावात पसरल्याचे आरोग्य कर्मचाºयांनी सांगितले. बाळकापरा गावातील एफव्हाय बीएला शिक्षण घेणारी २१ वर्षीय योजना अवतार या मुलीला ताप आला होता. मात्र, हा ताप हलका असल्याने ही मुलगी दवाखान्यात गेली नाही. मात्र, दोनच दिवसात त्या तरुणीचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर गावात खळबळ माजली आहे.
मात्र या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्यप कळाले नाही. विशेष म्हणजे ज्या दिवशी योजना अवतारचा मृत्यू झाला. त्यादिवशीही ती कॉलेजला गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले. आजही बाळकापरा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गावकºयांना गराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवण्याचे तसेच परिसरामध्ये कुठेही पाणी साठवू नये, पाणी उकळून प्या आदी सूचना केल्या आहेत.
ज्या दिवसापासून बाळकापरा गावात हिवतापाची साथ चालू झाल्याचे समजताच आम्ही सतर्कतेने आमचे आरोग्य विभागाचे पथक त्या ठिकाणी नेमले आहे. ताप येना-या प्रत्येक रुगणांवर उपचार सुरु आहे. गावात प्रत्येक घराघरात जावून आजरी रुगणांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे आजरी रुग्ण आटोक्यात आणले आहेत. आमचे कर्मचारी त्याठिकाणी आहेत.
-किरण पाटील, ता. आरोग्य अधिकारी (प्रभारी)