मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात सुविधांअभावी बाळ पोटातच दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 05:02 AM2019-11-10T05:02:35+5:302019-11-10T05:02:39+5:30
ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा व्यवस्थित नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे बाळ पोटातच दगावले.
मनोर : ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधा व्यवस्थित नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे बाळ पोटातच दगावले. मागील तीन महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे. आरोग्य विभाग किती निष्पापांचे बळी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नवी दापचरी येथील वंदना अंबाथ हिला शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पती रवींद्र व कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. तिथे कार्यरत असलेल्या डॉ. समीक्षा पाटील व आरोग्यसेविका लोखंडे व इतर आरोग्य कर्मचारी नैसर्गिक प्रसूतीसाठी प्रयत्न करीत होते. तिची प्रकृती गंभीर झाल्याने रवींद्रनी डॉक्टरांना सिझेरियन करण्यास सांगितले. कंत्राटावर असलेल्या डॉक्टरशी संपर्ककेला
पण ते न आल्याने शनिवारी पहाटे चारच्या सुमारास बाळ आईच्या पोटातच दगावले. त्यानंतर त्यास बाहेर काढले.
याबाबात रवींद्र म्हणाले की, माझ्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने मी त्या डॉक्टरांना सिझेरियन करायला सांगितल्यावर त्यांनी तुमच्याकडे पैसे आहेत का? सिझेरियन येथे होेणार नाही त्यासाठी पुढे जावे लागेल, असे सांगितले. डॉक्टर व आरोग्यसेविकांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावले. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.
>आम्ही प्रयत्न केले
बाळाने पोटात शी केली होती. त्याचे ठोकेही कमी झाले होते. त्यांना सांगितले पुढे घेऊन जा पण ते गेले नाही. पूर्ण महिनही झाले नसल्याने बाळाचे वजन कमी होते. आम्ही प्रयत्न केले असे डॉ. समीक्षा पाटील म्हणाल्या. सिव्हील सर्जन डॉ.कांचन वानिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या मला माहीत नाही मी चौकशी करते.