बाडापोखरण पाणी योजना रखडली, २९ गावांतील ग्रामस्थांचे पाण्याविना हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:38 AM2017-10-31T03:38:22+5:302017-10-31T03:38:30+5:30
डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले
डहाणू : डहाणूच्या साखरे धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही डहाणू, पालघर तालुक्यातील २९ गावांना तसेच खेडयापाडयांना दोन, आठ, तसेच पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याविना लोकांच्या डोळयात पाणी आले असतांनाच बाडापोखरण प्रादेशिक पाणी योजनेच्या नूतनीकरणाचे काम दोन वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण होत नसल्याने ही योजना रखडली आहे.
डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील २६ गावांना तसेच पालघर तालुक्यातील तारापूर, कांबोडे, सावराई अशी एकूण २९ गावांना या योजनेअंतर्गत साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु २००६ ला बाडापोखरण योजनेच्या जलवाहिनी कालबाह्य झाल्याने त्यावेळी शासनाने योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटीचे अनुदान मंजुर करून ५ मार्च २०१४ ला योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
या कामात ३२ नवीन जलकुंभाबरोबरच वानगांव ते साखरा पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे तसेच गावातील वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी बदलणे इत्यादी कामे संबंधित ठेकेदारांना देण्यात आली होती. परंतु सुरवातीपासूनच हे काम संथ गतीने सुरू असल्याने मुदतीत काम पूर्ण झाले नाही. हे काम जूनला पूर्ण होणार होते. परंतु दहा महिन्याचा कालावधी उलटूनही जलकुंभ, वॉल, ट्रान्सफार्मर, वितरण व्यवस्थेची अंतर्गत जलवाहिनी, मुख्य जलवाहिनी, जलकुंभाचे इनलेट, आऊटलेट, फिनिशिंग इत्यादी बहुसंख्य काम बाकी असल्याने ती केंव्हा पूर्ण होतील असा संतप्त सवाल संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ करीत आहे.
दरम्यान जीर्ण व जुनाट झालेल्या जलवाहिन्या वेळीच बदलल्या जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पंधरा, दिवस महिनाभर पाणी साठवून ठेवून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आली आहे.
तर ताणसी, ओसरवाडी तसेच धा. डहाणू या शेवटच्या टोकावर असलेल्या गावांत या योजनेचे पाणीच येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. दोन वेळा म्हणजेच आठ महिने मुदतवाढ देऊनही बाडापोखरण नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले नाही.
डिसेंबर २०१७ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार असून एक जानेवारी पासून ग्रामस्थांना पुरेशा प्रमाणात व सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
-अरूण निर्भवणे
कार्यकारी अभियंता
बाडापोखरण पाणी पुरवठा योजना