अनधिकृत बांधकामांवर डहाणूत कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:02 PM2019-06-11T23:02:40+5:302019-06-11T23:04:02+5:30
नगरपरिषदेची कारवाई : नागरिकांत समाधान
डहाणू : स्वच्छ डहाणू, सुंदर डहाणू हे ब्रीद यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नगरपरिषदेने सोमवारी शहरातील अनियमित, अनिधकृत बांधकामे जमीनदोस्त करून धडक कारवाई केली. त्यामुळे येथील बेकायदेशीर स्टॉल, टपऱ्या, हातगाड्या, दुकानांची रस्त्यावर आलेली अनियमित बांधकामे यापासून सुटका झाल्याने रस्त्यांनी व डहाणूकरांनी मोकळा श्वास घेतला. नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
निसर्गाचे हिरवेगार कोंदण लाभलेल्या डहाणू नगरीत स्टेशन, इराणी रोड, सागर नाका, तारपा चौक, मसोली, पोलीस स्टेशन परिसर, थर्मल पॉवर स्टेशन रोड या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते. याबाबत अनेक स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदने सादर केली आहेत. रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानदारांनी दरवाजासमोरील भागात अनियमित बांधकामे विस्तारित केली होती. फेरीवाल्यांचे स्टॉल, वडापाव, खाद्यपदार्थ, अल्पोपहार, चायनीज पदार्थ, कलिंगड विक्रेत्यांचे तंबू, चहाच्या टपºया, फळांच्या अनियमित पार्किंगच्या गाड्या इत्यादीवर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई केली. आता अशीच कारवाई पालिकेने पक्क्या बांधकांमावर करावी, नाहीतर ती नाटकी ठरेल, अशी चर्चा आहे.
कारवाईबाबत जनतेत समाधान
च्डहाणूतील या अनियमित बांधकामांमुळे शहरात वाहतूक कोंडी, प्रवाशांना रहदारीसाठी त्रास, अस्वच्छतेचा प्रश्न तसेच दुर्घटनांत वाढ अशा समस्या निर्माण झाल्याने योग्य वेळी नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने डहाणूच्या नागरिकांनी या कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असून यापुढेही अनियमित बांधकामांवर ती करण्यात येईल, असे नगरपरिषद प्रशासनाने कळविले आहे.