पालघर लोकसभा मतदार संघावर बविआ पक्षाचा हक्क - आ. ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:52 PM2019-03-15T22:52:13+5:302019-03-15T22:52:50+5:30
बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआ पक्षाचा हक्क असून येथून पहिला खासदार हा आमचा निवडून आला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत अशा शब्दात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर वर आपला दावा केला आहे.
वसई : येथील बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआ पक्षाचा हक्क असून येथून पहिला खासदार हा आमचा निवडून आला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत अशा शब्दात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर वर आपला दावा केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी देशात आदर्श आचारसाहिता लागू झाली आणि निवडणूकीची धामधूम सुरू झाली. त्यातच राजकीय दृष्टीने पालघर हा मुंबई जवळील मुख्य मतदारसंघ आहे. मात्र, यावर आ. ठाकूर यांनी अद्याप पर्यंत मौन बाळगले होते. परिणामी मंगळवारी प्रथमच त्यांनी याबाबत आपली चुप्पी सोडत आपण यावेळी काय करणार आहात ते सांगितले, ते पुढे म्हणाले की आतापर्यंत प्रत्येक वेळी आम्ही सर्वांना बिनशर्त पाठिंबा देत आलो आहोत. त्यामुळे यावेळी आम्हालाच सर्वांनी पाठिंबा द्यावा यासाठी मी सर्वच राजकीय पक्षांशी बोलणी सुरू केली आहे.
आप्पांच्या घोषणेमुळे नेते झाले सावध
पालघर मतदार संघावरून युतीमध्ये तणाव असून तो अजूनही निवळलेला नाही, तर दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नसल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार ठरवून या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे अचानक आलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घोषणेमुळे युती व आघाडीच्या नते सावध झाले आहेत.