फटाका व्यवसायावर बंदी आणा
By admin | Published: October 14, 2015 02:19 AM2015-10-14T02:19:50+5:302015-10-14T02:19:50+5:30
राज्यभर प्रसिद्ध असलेला वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय हा नियमबाह्य आहे. एखादी दुर्घटना घडल्यास हजारो नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो
वाडा : राज्यभर प्रसिद्ध असलेला वाड्यातील फटाक्यांचा व्यवसाय हा नियमबाह्य आहे. एखादी दुर्घटना घडल्यास हजारो नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या व्यवसायावर बंदी आणा, अशी मागणी मनसेने पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून तत्काळ कारवाई न झाल्यास २६ आॅक्टोबरपासून वाडा तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे फटाका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
वाडा शहरातील परळीनाका, देसईनाका, मस्जिदनाका या भागात फटाक्यांची दुकाने आहेत. तामिळनाडूतील शिवा-काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथून फटाक्यांचा संपूर्ण माल वाड्यात आणला जातो. मलवाडा या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक फटाका व्यापाऱ्यांनी गोदामे बांधलेली आहेत. दरवर्षी येथे कोट्यवधींची फटाका विक्री होत असते. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, गुजरात या शहरातील व्यावसायातील व किरकोळ खरेदीदार मोठ्या प्रमाणावर येथून फटाके खरेदी करतात. हे व्यावसायिक फटाक्यांचा साठा मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु हा साठा करताना कोणतीही सुरक्षितता राखली जात नाही. अनेकांनी मुख्य रस्त्यालगत दुकाने थाटल्याने एकूणच नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. आग प्रतिबंधक अग्निशमन यंत्रणा येथे नसल्याने आगीच्या वाढत्या घटना पाहता या व्यवसायावर बंदी आणावी अशी मागणी मनसेने केली आहे.
हे व्यावसायिक परवाने घेताना शासनाने घातलेले नियम धाब्यावर बसवून फटाक्यांची विक्री करीत आहेत. परवानगीपेक्षा अधिक साठा करून फटाका विक्री केली जाते. प्रत्यक्षात मात्र कमी फटाका विक्री दाखवून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविला जातो. त्याचप्रमाणे वाहतूकीचा परवाना नसलेल्या वाहनांतून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे कोणतीही आग प्रतिबंधक काळजी घेतली जात नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास संपूर्ण वाडा शहर आगीच्या भक्षस्थानी जाऊ शकते. कारण वाड्यात कोणत्याही प्रकारची अग्नीशमन यंत्रणा नसल्याने मोठ्या प्रमाणावर जिवीत व वित्तहानी होण्याची भीती निवेदनात व्यक्त केली आहे.
वाड्यातील फटाका व्यवसाय करणारे व्यापारी ग्राहकांना कोणतीही पावती देत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विक्रीकर, आयकर बुडविला जातो. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करूनही प्रत्यक्षात अल्प प्रमाणात शासनाला कर रूपाने महसूल जमा होतो. या व्यवसायिकांनी नियम धाब्यावर बसवून सुरु असलेल्या व्यवसायास महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरु असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. जनहित लक्षात घेऊन वाडा तालुक्यात अग्नीशमन यंत्रणा जोवर अस्तित्वात येत नाही. तोवर वाड्यातील या व्यावसायिकांना फटाका विक्री व साठवणूकीचे परवाने रद्द करावेत अशी मागणी मनसेचे पालघर उपजिल्हा प्रमुख गोविंद पाटील, तालुका प्रमुख भरत हजारे, सचिव देवेंद्र भानूशाली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (वार्ताहर)