तारापूरच्या दाेन कंपन्यांच्या उत्पादनावर घातली बंदी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 01:37 AM2020-12-08T01:37:00+5:302020-12-08T01:37:44+5:30
Tarapur News : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुगम केमिकल्स आणि डेल्टामाइक स्पेशालिटी या दाेन कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
बोईसर : प्रदूषणासंबंधीची नियमावली काटेकाेरपणे न पाळणाऱ्या तारापूर एमआयडीसीतील दाेन कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदीची कारवाई केली आहे. अशाच प्रकारे आणखी काही उद्योगांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुगम केमिकल्स आणि डेल्टामाइक स्पेशालिटी या दाेन कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व सर्वेक्षण करणाऱ्या टीमने या कंपन्यांना दिलेल्या भेटीवेळी उत्पादन प्रक्रियेदरम्यान मंडळाने दिलेल्या माहितीप्रमाणे, तसेच पर्यावरणसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी काटेकोर होत नसल्याचे आणि काही त्रुटी निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली. तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांतून व सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) प्रक्रिया न करताच, मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूर समुद्रात आणि परिसरातील नाल्यांमध्ये सोडले जाते. त्याचा दुष्परिणाम नवापूर किनारपट्टी भागातील मच्छीमार व शेतजमीन, पर्यावरण आणि आरोग्यावर होत असल्याची याचिका अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केली हाेती. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर, २०१६ पासून विशेष मोहीम हाती घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद व उत्पादन का बंद करण्यात येऊ नये, अशा नाेटिसा बजावण्यात आल्या हाेत्या, तर काहींचे उत्पादन तात्पुरते स्थगित केले हाेते. मात्र, यानंतरही काहीच सुधारणा नसून या कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी करण्याची स्थानिकांकडून हाेत आहे. दरम्यान, प्रदूषण मंडळाच्या कारवाईने इतर प्रदूषणकारी कंपन्यांचेही धाबे दणाणले आहे.