बाप्पा, कोरोनाचे विघ्न संपव! पालघरमध्ये ४०,८९८ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 02:16 AM2020-08-24T02:16:22+5:302020-08-24T02:16:37+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक घरगुती व सार्वजनिक गणपती वसई तालुक्यात असून सार्वजनिक ५०२ तर घरगुती ३१ हजार ७९२ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
पालघर : शासनाने तसेच पोलीस अधीक्षकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा गणेशोत्सव शांततेत व मर्यादित स्वरूपात साजरा करण्याच्या केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील गणेशभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्यात यंदा ४० हजार ८९८ घरगुती तर १२४७ सार्वजनिक गणपतीबाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या वेळी भक्तांनी जगावर आलेले कोरोनाचे संकट संपव, अशी प्रार्थना केली. दरम्यान, रविवारी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत अत्यंत साधेपणाने करण्यात आले.
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केले होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सभा घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी समुपदेशन करण्याच्या प्रयत्नात यश मिळाले होते. जिल्ह्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी भव्य मंडपाच्या संकल्पनेला बगल देत मंडळाच्या अध्यक्षांच्या घरी गणेशाची स्थापना करून ११ दिवसांऐवजी फक्त दीड दिवसाचे आयोजन केले होते. काही मंडळांनी शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक कार्यासाठी हजारो रुपयांच्या देणग्या देत कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून आले होते.
पालघर जिल्ह्यात ४० हजार ८९८ घरगुती तर १ हजार २४७ सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आली. गणेशोत्सवात गणेशाचे आगमन होत असताना दरवर्षी दिसणारे बँड, ताशे, लेझीम, बेंजो आदी वाद्ये वाजल्याचे कुठेही दिसून आले नाही. आपल्या आवडत्या बाप्पाचे धडाक्यात, नाचत गात होणारे स्वागत या वर्षी फक्त ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात झाले असले तरी कोरोनाच्या संसर्गामुळे गणेशभक्तांनी आपल्या उत्साहावर नियंत्रण मिळविल्याने पाहावयास मिळाले.
जिल्ह्यात सर्वाधिक घरगुती व सार्वजनिक गणपती वसई तालुक्यात असून सार्वजनिक ५०२ तर घरगुती ३१ हजार ७९२ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याखालोखाल पालघर तालुक्यात ३४२ सार्वजनिक व ५ हजार १२० घरगुती गणपतींच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत, तर डहाणू तालुक्यात २०९ सार्वजनिक व १३८४ घरगुती गणपती बसविण्यात आले आहेत तसेच जव्हारमध्ये ५६ सार्वजनिक व २७५ घरगुती गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोखाडा तालुक्यात एकही सार्वजनिक गणपतीची स्थापना नसून केवळ ४५१ घरगुती गणपतींचा उत्सव साजरा केला जात आहे.
विक्रमगड तालुक्यात २६ सार्वजनिक व २४८ घरगुती गणपती बसविण्यात आले आहेत. वाडा तालुक्यात ४२ सार्वजनिक आणि ७४३ घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. तलासरी तालुक्यात ७० सार्वजनिक व ८५ घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण ४० हजार ८९८ घरगुती आणि १२४७ सार्वजनिक गणपतीच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
शासन निर्देशांचे पालन
पालघरमधील भाजी मंडईतील फुलांचा राजा, जुन्या पालघर येथील सर्वात उंच व मानाचा समजला जाणारा ‘पालघरचा राजा’, शुक्ला कंपाऊंडचा गणपती, मध्य पालघर, असे अनेक ठिकाणचे गणपती व बोईसरमधील पंचतत्त्व सेवा संस्था, अवधनगर, एमआयडीसीचा राजा, कॅम्नीननाका, बोईसर रेल्वेस्थानक येथे रिक्षा चालक-मालक संघटना, वंजार वाड्याचा राजा, बोईसरचा महाराजा अशा विविध सार्वजनिक मंडळांत हजारो नागरिक दर्शनासाठी येत असतात, मात्र या वेळी मंडळांनी शासनाच्या निर्देशाचे पालन करीत गणेशोत्सव साजरा केल्याचे पाहावयास मिळाले.