गांधी जयंतीनिमित्त डहाणूत साकारले बापूंचे वाळूशिल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:34 PM2019-10-02T23:34:29+5:302019-10-02T23:37:21+5:30
१५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
डहाणू/बोर्डी - १५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तर चिखले-घोलवडच्या विजयवाडी किनाऱ्यावर महात्मा गांधीजींचे उभे वाळूशिल्प आणि भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह साकारले होते. डहाणू विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते या कार्यक्र माचे उद्घाटन झाले. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केल्यानंतर सामूहिक स्वच्छता आणि मतदान जनजागृतीबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली. तर लोकशाही उत्सवाचे पथनाट्य जिल्हा परिषद शिक्षकांच्या पथकाने सादर केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना प्लास्टिक बंदीचा संदेश देताना कापडी पिशव्यांचे वाटप केले.
डहाणूत नागरिक स्वयंप्रेरणेने जमिनीवरील तसेच सागरी जैवविविधता टिकविण्यासाठी २०१२ सालापासून कांदळवन स्वच्छतेचे कौतुकास्पद कार्य करीत आहेत. आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन सौरभ कटियार यांनी केले.
कांदळवानांचे महत्त्व अधोरेखित करून त्याच्या संवर्धनाकरिता स्थानिकांचा जोश स्फूर्र्तिदायक असल्याचे गौरवोद्गार उपवन संरक्षक भिसे यांनी काढले. तर तालुक्यात तटरक्षक दलाकडून किनारा स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याची माहिती या दलाचे कामांडंट संतोष नायर यांनी दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हा हक्क बजावयालाच हवा असे आवाहन यावेळी भारताचा दिव्यांग क्रि केट संघाचा कर्णधार आणि पालघर जिल्हा विशेष मतदार जागृती दूत विक्र ांत केणी यांनी केले. त्याला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या उपक्र मात भारतीय तटरक्षक दल, पोलीस, वन विभाग, जि.परिषद प्राथमिक शाळा आणि रुस्तमजी अॅकेडमीचे विद्यार्थी, वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि स्थानिक सहभागी होते. यावेळी उपवन संरक्षक भिसे, तटरक्षक दलाचे कामांडंट संतोष नायर, तहसीलदार राहुल सारंग, दिव्यांग विश्व चषक विजेता भारतीय कर्णधार विक्र ांत केणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गांधीजींच्या वाळूशिल्पाची प्रशंसा
दक्षिण भारताप्रमाणेच उभे वाळूशिल्प साकारण्याची दुर्मिळ कला या जिल्ह्यात बोर्डीतील भास्कर दमणकर यांना अवगत आहे. १५० व्या गांधी जयंतीला बापूंचे ध्यानस्थ अवस्थेतील सहाफूट उंचीचे शिल्प त्यांनी पाच तासांच्या काळात निर्मिले. त्याची प्रशंसा झाली.