मित्राचे तुकडे करण्यासाठी घेतला बिद्रे प्रकरणाचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:19 AM2019-01-25T04:19:37+5:302019-01-25T04:19:43+5:30
साठ हजार रुपयांसाठी मित्राची तीनशेहून अधिक तुकडे करून हत्या करणाऱ्या आरोपीने असे करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे प्रकरणाचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात सांगितले.
मनिष म्हात्रे
वसई : साठ हजार रुपयांसाठी मित्राची तीनशेहून अधिक तुकडे करून हत्या करणाऱ्या आरोपीने असे करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे प्रकरणाचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात सांगितले.
मीरा रोड येथे राहणाºया पिंटू शर्मा या तरुणाने गणेश कोल्हटकर (५८) या मित्राची निर्घृण हत्या करून तब्बल तीनशे बारीक तुकडे केल्याची घटना विरारमध्ये मंगळवारी उघडकीस आली होती. अर्नाळा सागरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपी पिंटूला गजाआड केले आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याने या गुन्ह्यासाठी वापरेल्या वस्तू, मृतदेहाचे इतर अवशेष शोधणे सुरू आहे.
कोल्हटकरने पिंटूकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ६० हजार रुपये बाकी होते. त्यावरून हा वाद होता. त्यामुळेच पिंटूने कोल्हटकरांची आपल्या विरार येथील घरात बोलावून हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे यांची हत्या अशाच पद्धतीने करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकले होते. आरोपी शर्मा याने याच बेद्रे प्रकरणावरून मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावण्याची योजना बनवली, असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.
आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असल्याचे शर्मा याने पोलिसांना सांगितले. १६ जानेवारीला शर्मा याने कोल्हटकरांची हत्या केली आणि तुकडे करण्यास सुरुवात केली. संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे घरी गेला. मात्र त्याला जेवण जात नव्हते. तो बायकोला मी बाहेरच जेवून आलो असे सांगायचा, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी २५ हून अधिक साक्षीदारांच्या जबान्या घेण्यास सुरुवात केली आहे. इमारतीच्या शौचालयाच्या टाकीतून पोलिसांनी सुमारे ४० किलो मृतदेहाचे मांस गोळा केले आहे.