तब्बल 16 तास वादळवाऱ्यात समुद्राशी दिली झुंज; फेसाळत्या लाटांशी दोन हात केलेल्या सावळारामने सांगितला थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 02:02 PM2023-05-15T14:02:29+5:302023-05-15T14:03:58+5:30
...अखेर सातपाटी येथील एका मच्छीमार बोटीतील मच्छीमारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मला बोटीत घेतले. हा थरार कथन केला आहे सावळाराम पाटील (४२) या तरुणाने. आणखी १० तास पोहू शकलो असतो, असेही सावळाराम म्हणाला. यावरूनच मच्छीमाराला ‘दर्याचा राजा’ का म्हणतात, याची प्रचिती आली.
हितेन नाईक -
पालघर : एडवण येथील ‘वैष्णवदेवी’ या बोटीतून शनिवारी रात्री पाय घसरून अचानक पाय घसरून पडतो. कुणालाच मी समुद्रात पडल्याचा अंदाज आला नाही आणि बोट पुढे निघून गेली. चोहोबाजूला पाणीच पाणी... मिट्ट अंधारात तब्बल १६ तासा पोहोत राहिलो, पण जिद्द सोडली नाही. रात्र सरली... सूर्य उगवताना दिसला आणि पुन्हा नव्या उमेदीने उगवत्या सूर्याच्या दिशेने पोहायला सुरुवात केली... अखेर सातपाटी येथील एका मच्छीमार बोटीतील मच्छीमारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मला बोटीत घेतले. हा थरार कथन केला आहे सावळाराम पाटील (४२) या तरुणाने. आणखी १० तास पोहू शकलो असतो, असेही सावळाराम म्हणाला. यावरूनच मच्छीमाराला ‘दर्याचा राजा’ का म्हणतात, याची प्रचिती आली.
पालघर तालुक्यातील एडवन येथील दीपेश तरे यांची ‘वैष्णवदेवी’ ही बोट बंदरातून शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता मासेमारीसाठी रवाना झाली. अरबी समुद्रात २३ नाॅटिकाल समुद्री क्षेत्रात असलेल्या आपल्या कविवर जाळे लावण्यासाठी हे निघाले असताना मधल्या काळात त्यांनी जेवण उरकले.
रात्री जाळे मांडायचे असल्याने बोटीचा तांडेल बोट चालवीत असल्याने सर्व जण झोपी गेले. अनेक तासांच्या प्रवासानंतर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी काही वेळ बाकी असताना तांडेल यांनी सर्वांना उठवले आणि जाळे मांडण्याची तयारी करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी सर्व उठून तयारी करीत असताना सावळाराम दिसत नसल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. समुद्रात मोठमोठ्यांनी हाका मारल्यानंतरही त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तो कुठेच आढळून न आल्याने तो समुद्रात पडल्याची खात्री पटली आणि बोट त्याच मार्गाने त्याच्या शोधार्थ माघारी फिरविण्यात आली.
पोलिस आणि कोस्ट गार्डची धडपड
अनेक तासांच्या प्रयत्नानंतरही तो सापडला नसल्याने बोटीत कोस्ट गार्डकडून देण्यात आलेल्या दिस्ट्रस अलर्ट सिस्टम या आपत्कालीन मशीनचे ४ नंबरचे बटण दीपेश तरे यांनी दाबून मदत मागितली. मात्र, मदत उपलब्ध न झाल्याने शेवटी केळवे पोलिसांशी संपर्क साधल्यावर सपोनि भीमसेन गायकवाड यांनी कोस्ट गार्डशी संपर्क साधून हेलिकॉप्टरची मदत उपलब्ध करून देण्यात आली, परंतु शोध लागला नाही. केळवे पोलिसांनी सर्व बोटींशी संपर्क साधल्यावर ‘योग दत्त’ बोटीतील मच्छीमारांना सावळाराम पोहत असल्याचे दिसून आले. त्याला बोटीत घेतल्यावर ‘वैष्णव देवी’ या त्यांच्या बोटीशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ताब्यात दिले.