पाण्यावरून बविआ-शिवसेनेत संघर्ष; चंद्रपाडावासीयांवर पाणीसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 02:14 AM2020-06-28T02:14:32+5:302020-06-28T02:14:55+5:30
चंद्रपाडा, वाकीपाडा आणि जूचंद्र या परिसराला पाणीपुरवठा करणारा पाझर तलाव उन्हाळ्यात आटून पाण्याच प्रश्न निर्माण होतो.
विरार : वसई-विरारमधील पाणीप्रश्न नेहमीच कळीचा ठरला आहे. सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्यात सत्ताधारी पक्षाला पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात आलेले अपयश यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, पाणी- प्रश्नावरून शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
सध्या नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा, जूचंद्र आणि वाकीपाडा परिसराला पाणीपुरवठा करणारा एकमेव जलस्रोत असलेला पाझर तलाव आटल्याने बुधवारपासून या तिन्ही गावांना तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यातील जूचंद्र हे महापालिका प्रशासनात मोडत असल्याने या गावासाठी सूर्या व पेल्हार धरणांतून पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, चंद्रपाडा गावात असलेल्या मोठ्या क्षमतेच्या जलकुंभात पाइपलाइन जोडली गेली नसल्याने नागरिकांना पाण्यावाचून हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या परवानगीने येथे नळजोडणीला परवानगी मिळाली असून येत्या तीन दिवसांत जोडणीचे काम पूर्ण होऊन चंद्रपाडावासीयांना पाणी मिळणार आहे. मात्र, पाणी मिळण्याआधीच या पाण्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा शिवसेना आणि बविआ या दोन उभय पक्षांमध्ये रंगली आहे. हे काम आपल्यामुळेच झाले असल्याचा दावा शिवसेना व बविआ या दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियावर मॅसेजेसद्वारे होत असल्याचे दिसून येते.
चंद्रपाडा, वाकीपाडा आणि जूचंद्र या परिसराला पाणीपुरवठा करणारा पाझर तलाव उन्हाळ्यात आटून पाण्याच प्रश्न निर्माण होतो. यंदा जून महिन्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जूचंद्रकरांची तहान सूर्या व पेल्हार धरणांनी भागवली असली, तरी चंद्रपाडावासीयांना मात्र पाणी- संकटाला सामोरे जावे लागत आहे. येथील ६९ गावांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना बारगळल्याने नागरिकांसमोर पाण्याचे विघ्न उभे आहे. दरम्यान, चंद्रपाडा ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे. ग्रामपंचायतीने नळजोडणी केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा आरोप बविआने केला आहे.
जलकुंभात पाइपलाइन टाकण्यात उदासीनता : चंद्रपाडा येथील श्री चंडिकादेवी मंदिर पायथ्याजवळ एक लाख १० हजार लीटर पाण्याची क्षमता असलेला जलकुंभ बांधण्यात आला आहे. सदर जलकुंभासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. तसेच पुढे नळजोडणी कामाचा शुभारंभ आ. हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला होता. त्यानंतर, मात्र चंद्रपाडा ग्रामपंचायतीकडून या जलकुंभात पाइपलाइन टाकण्यात दाखवलेल्या उदासीनतेमुळे मागील नऊ महिन्यांपासून नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.