लैैलाच्या भेटीसाठी आलेल्या मजनूला चोर समजून दिला बेदम चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:39 PM2019-07-22T22:39:11+5:302019-07-23T06:23:50+5:30
मागील अनेक दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर असे ओरडायला सुरुवात केली.
नालासोपारा : विरारच्या फुलपाडा परिसरात प्रेमिकेला भेटण्यासाठी रविवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या मजनूला चोर समजून स्थानिकांनी फटकवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी प्रेमिकेला भेटण्यासाठी लपून छपून इमारतीच्या मागील बाजूने येणे या मजनूला चांगलेच महागात पडले आहे. या मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी आता त्या तरुणाला शोधून काढले असून याचा शोध घेत तपास करत आहे.
विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील डोंगरी विभागात रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा एक तरुण मद्यधुंद अवस्थेत प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईप व ग्रीलवर चढून मोठ्या कष्टाने टेरेसपर्यंत पोहोचला. दरम्यान बिल्डींग परिसरात वावरणाऱ्या रहिवाशांचे या त्याच्याकडे लक्ष गेले. मागील अनेक दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा चोर असल्याचा संशय नागरिकांना आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्याने चोर चोर असे ओरडायला सुरुवात केली. आपल्याला चोर समजत असल्याचे लक्षात आल्यावर हा तरुण घाबरला आणि पळ काढू लागला. एका बिल्डींगच्या टेरेसवरून दुसºया बिल्डिंगवर तो उड्या घेत असल्याने हा चोर असल्याचा संशय अधिक बळावला. अखेर २०० ते ३०० हून अधिक संतप्त नागरिकांनी त्याला खाली उतरवून चोप दिला. नागरिकांच्या मारहाणीत हा तरुण जखमी झाला आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याचा शोध घेत असतांना सोमवारी दुपारच्या सुमारास विरार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तो आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे. तसेच हा तरुण याच परिसरात राहणारा असून रहिवासी त्याला ओळखत असल्याचेही पोलिसांना सांगितले असून नेमकी घटना काय होती, मारहाण करणारा किती जमाव मोठा त्यात कोण कोण होते मारहाण करण्यात आघाडीवर कोण होते हे आता पोलिसांना त्याने सांगितल्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
या मजनूची लैैला होती तरी कोण? या प्रश्नाची खमंग चर्चा महानगरात सध्या सुरू आहे. आता एवढे रामायण झाल्यावर तो दारू सोडतो की, प्रेयसीला सोडतो. याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.