रो रो सेवेत हुल्लडबाज तरुणांचीं बियर पार्टी; सोशल मीडियावर चित्रफीत व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2024 01:57 PM2024-03-25T13:57:59+5:302024-03-25T13:58:38+5:30
टेबल खुर्च्या टाकून समुद्रात पार्टी
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- मीरा-भाईंदर, वसई विरार शहर कमी वेळात जोडण्यासाठी समुद्रात सुरू केलेल्या ‘आरोही’ नावाच्या बोटीत काही हुल्लडबाज तरुणांनी दारूची पार्टी केल्याचे उघडकिस आले आहे. याबाबतची चित्रफीत समोर आला असून ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. बोट मालकानेच ठेकेदाराला वाढदिवस मेजवानीसाठी परवानगी दिल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने सांगितले आहे.
रविवारी भाईंदर जेट्टीजवळ उभ्या करण्यात आलेल्या ‘आरोही’ या फेरीबोटीमध्ये काही तरुण मद्यपान करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर पसरली. या बोटीत रात्रीच्या सुमारास बसून तरुण जोरात गाणी लावून मद्यपान करत असल्याचे चित्रफीतीमध्ये दिसून येत आहे. ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करीत सदर रोरो सेवा बोट ही मद्यपार्टीचा अड्डा आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रकारे जर सार्वजनिक सेवेसाठी असलेल्या बोटीत मद्याची मेजवानी केली जात असेल तर रोरो बोटीच्या सुरक्षेचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ लागला आहे.
मद्यपान करणारे तरुण मंडळी कोण होते व कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते होते का हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. याबाबत पोलीस ठाण्यातही कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. हा प्रकार उघडकीस होताच महाराष्ट्र सागरी मंडळांने मात्र सावध भूमिका घेतली आहे. हा प्रकार प्रवासी सेवेदरम्यान घडला नसल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही शासनाची बोट नसून ती खासगी आहे त्यामुळे त्याचे प्रवासी काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर कसा करावा हा प्रश्न बोट मालकाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.