निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बविआचे प्रशिक्षण शिबिर
By admin | Published: October 8, 2015 11:12 PM2015-10-08T23:12:29+5:302015-10-08T23:12:29+5:30
पालघर विधानसभा पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणुका व नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविकांना प्रशिक्षण याकरीता बहुजन विकास आघाडीने नानी दमण येथे प्रशिक्षण
- दीपक मोहिते, वसई
पालघर विधानसभा पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणुका व नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविकांना प्रशिक्षण याकरीता बहुजन विकास आघाडीने नानी दमण येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. गेले ३ दिवस सुरू असलेल्या या शिबीराचा काल सायंकाळी समारोप झाला.
पालघर विधानसभा पोटनिवडणूक बहुजन विकास आघाडीने प्रतिष्ठेची केली असून ही निवडणुक जिंकायची अशा इर्षेने बहुजन विकास आघाडी कामाला लागली आहे. काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना रोखण्यासाठी बविआने रणनीती आखली आहे. येथे सेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पालघरची विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यामुळे ही लढत चौरंगी होऊ शकते. गावित यांना रोखण्यासाठी अखेरच्या क्षणी बविआ व राष्ट्रवादी रिंगणातून बाहेर पडतील व सेना-काँग्रेस अशी सरळ लढत होईल असा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित, सेनेच्या कृष्णा घोडांकडून कमी फरकाने पराभूत झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेनेत आलेल्या कृष्णा घोडा यांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणली होती. त्यांच्या निधनानंतर सेनेने त्यांचे चिरंजीव अमीत घोडा यांना रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते आ. हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या तमाम कार्यकर्त्यांना नानीदमण येथे पाचारण केले. गेले ३ दिवस विधानसभा पोटनिवडणुक, ग्रामपंचायत निवडणुका व विरोधकांना सामोरे जाण्यासाठी रणनीती अशा ३ विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या शिबीरात सर्व नगरसेवक, जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. काल सायंकाळी या शिबीराचा समारोप झाला.