प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवणार बेंचेस; ‘सेव्ह द अर्थ फाऊं डेशन’, वसई मनपाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:13 AM2019-12-12T01:13:26+5:302019-12-12T01:13:48+5:30
मॅरेथॉनदरम्यान रस्त्यावरील हजारो रिकाम्या बाटल्यांचे संकलन
वसई : वसई - विरार महानगरपालिका मॅरेथॉनदरम्यान रस्त्यावर फेकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचे ‘सेव्ह द अर्थ’ या पर्यावरणवादी संस्थेकडून संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे, या बाटल्यांवर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून बेंचेस तयार करण्यात येणार आहेत. हे बेंचेस वसई - विरार मनपाला भेट देण्यात येणार आहेत.
वसई-विरार महापौर राष्ट्रीय मॅरेथॉनला देश-विदेशातल्या १८ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी एका कंपनीने ३० हजार ली. पाणी पुरवले. मॅरेथॉनच्या मार्गात नागरिक तसेच स्पर्धकांसाठी जवळपास २४ ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पाणी प्यायल्यानंतर रस्त्यावर या बाटल्या टाकण्यात आल्या. या सर्व रिकाम्या बाटल्यांचे वसई - विरार महानगरपालिका आणि ‘सेव्ह द अर्थ फाउंडेशन’ या संस्थेने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने संकलन केले. या बाटल्या तसेच इतर जमा झालेल्या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रि या करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या जमा करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून बसण्यासाठी बेंचेस बनवण्यात येणार आहेत. ही बाकडी वसई - विरार महानगरपालिकेला भेट देण्यात येणार आहेत. यावेळी, वसईतील न्यू इंग्लिश महाविद्यालयाच्या एन.एस.एस टीमने या कामात उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संस्थेला चांगले सहकार्य केले. त्याबद्दल प्राचार्य एम.एस.दुतोंडे व एन.एस.एस चे प्रमुख महेश अभ्यंकर यांचे देखील सेव्ह द अर्थ फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले. ‘सेव्ह द अर्थ फाऊंडेशन’ ही संस्था गेल्या १० वर्षापासून ठाणे व पालघर जिल्ह्यात पर्यावरण रक्षणासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून काम करीत आहे.
प्लास्टिकला कचरा न समजता तो योग्य पद्धतीने जमा करावा, असे आवाहन संस्थेने सर्वांना केले आहे.हा उपक्रम व्यवस्थित पार पडावा, यासाठी संस्थेचे कार्यकर्ते हेमंत डोंगरे, संतोष काकडे, नंदा बुरकुले, शैलेश चव्हाण, राजेश नलावडे, नीलेश कराळे व ऋतुजा यांनी विशेष मेहनत घेतली.