भालिवली रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा!
By admin | Published: January 13, 2017 05:40 AM2017-01-13T05:40:33+5:302017-01-13T05:40:33+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे भालिवली येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला आहे
पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मौजे भालिवली येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाला आहे. याबाबत आयआरबी प्रशासनाला अनेकदा आठवण देऊनही ती त्याचे काम सुरु करण्यास चालढकल करीत आहे. भालिवली हा एक असा नाका आहे की, महामार्गाच्या विभागलेल्या रस्त्यावर भालिवली व त्याच्या पुढे पुन्हा विभागलेल्या एका रस्त्यावरून , बेलवाडी, पाचरु खे , मडकेपाडा, किणी पाडा, तरे पाडा व दुसऱ्या रस्त्यावर जांभूळ पाडा, नवसई, भाताणे, आडणे, थळ्याचा पाडा आदी गावांव्यतिरिक्त अनेक पाडे व वस्त्या आहेत. यामध्ये खानिवडे प्रतिभा विद्यामंदिरात , बेलवाडी शासकीय आश्रम शाळेत येणारे व महाविद्यालयीन शिक्षणासाठी चांदीप, वसई, विरार येथे जाणारे हजाराच्या आसपास विद्यार्थी आहेत. तसेच भाताणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तेथे उपचारार्थ जाणारे-येणारे रुग्ण, शेतकरी, कष्टकरी, सोमवार व गुरु वारच्या आठवडे बाजारात येणारे जाणारे बाजारकरू, सातिवली , पेल्हार विरार वसई येथील छोट्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार तसेच रिसॉर्टमध्ये येणारे पर्यटक तसेच तीन गावांसाठी असलेली महामंडळाची बस सेवा आदींना हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागत आहे. यामुळे आजतागायत या ठिकाणी बरेच अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून कित्येक जणांना कायमचे अपंगत्व आले. तरी या पूलाचे बांधकाम सुरु होत नाही. त्यामुळे अजून किती अपघात घडून बळी गेले म्हणजे आयआरबी या पूलाचे बांधकाम सुरू करेल असा संतप्त सवाल येथील प्रवासी व रहिवासी करीत आहेत. (वार्ताहर)
याबाबत अनेकदा तक्र ारी केल्यानंतर १५ दिवसांपूर्वी येथे काम चालू केले होते. मात्र काहीच अंतरावर असलेल्या टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण आयआरबी बांधकाम प्रशासनाने देऊन काम थांबवले आहे . मात्र हे कारण संयुक्तिक नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने दिरंगाई टाळून उड्डाण पुलाचे काम सुरु करणे आवश्यक आहे. अन्यथा गावकरी टोल नाका बंद पाडणार असून पुढे उचलणार असलेल्या पावलास आयआरबी प्रशासन जबाबदार असेल .
- नरेंद्र पाटील, माजी उप सभापती पं.स. वसई
काही अडचणींमुळे काम बंद आहे हे जरी खरे असले तरी ते येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ववत सुरु होणार आहे . ’’
- अमित साठे,
आयआरबी बांधकाम अधिकारी