भिवंडीत ५०० कोटी रुपयांवर मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:19 AM2019-12-28T00:19:12+5:302019-12-28T00:19:26+5:30
भिवंडी पालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती राज्य शासनाने मागवावी तसेच कॅगमार्फत
भिवंडी : भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून गेल्या पाच वर्षांत ५०० कोटींचा निधी उपलब्ध झाला. मात्र, त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. भिवंडी पालिकेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती राज्य शासनाने मागवावी तसेच कॅगमार्फत या विकासकामांची व त्यावर खर्च झालेल्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे आ. रईस शेख यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांसह नगरसेवकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.
शिक्षण, इमारत दुरु स्ती, वैद्यकीय सेवा, भुयारी गटार योजना, अल्पसंख्याक विकास निधी, अपंग कल्याण निधी, १४ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना आदी विविध विकास योजनांसाठी शासनाने गेल्या पाच वर्षांत सुमारे ५०० कोटींहून अधिक निधी उपलब्ध केला. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आ. शेख यांचे म्हणणे आहे.