शेतकरी कायद्याविरोधातील 'भारत बंद'ला बविआचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 03:16 PM2020-12-07T15:16:22+5:302020-12-07T15:17:05+5:30
पालघर जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे - हितेंद्र ठाकूर
वसई - शेतकरी विरोधी कायद्याविरोधात नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. आज विरार येथे बहुजन विकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला असल्याने मंगळवार 8 डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. मागील बारा दिवसापासून पंजाब,हरियाणा व महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर कूच करीत धडक मारली आहे.
दरम्यान केंद्र सरकार व शेतकऱ्यांची समन्वय समिती यांच्यामध्ये आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या ,परंतु या सर्व चर्चा सर्व स्थरावर निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी उद्या 8 डिसेंबर ला भारत बंदचे आवाहन केले आहे. परिणामी या भारत बंदला वसईचे आमदार तथा बविआ चे अध्यक्ष आम.हितेंद्र ठाकूर यांनी आज विरार स्थित आपल्या पक्ष कार्यालयात आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती दिली आहे. एकूणच या बंद मध्ये आता राज्यातील सत्ताधारी व केंद्रतील विरोधी पक्ष सोबत पालघर जिल्ह्यातील बलाढय अशी बहुजन विकास आघाडी सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.