भाटेबंदरला उद्यापासून वेलंकनी यात्रा
By admin | Published: August 28, 2016 03:54 AM2016-08-28T03:54:44+5:302016-08-28T03:54:44+5:30
येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची
भार्इंदर : येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची माहिती तीर्थमंदिर सुकाणू समितीचे अध्यक्ष रेनॉल्ड बेचरी यांनी दिली.
यात्रेचा प्रारंभ मुंबई सरधर्मप्रांताचे बिशप अॅग्नेलो ग्रेशियस यांच्या उपस्थितीत होईल. या वेळी परंपरेनुसार वेलंकनीमातेची पालखी परिसरातील दर्यामाता चर्चमधून निघून ती तीर्थमंदिरात आणली जाणार आहे. त्यानंतर, मंदिरात विधिवत वेलकंनीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिर आवारात २० फूट उंचीचे धार्मिक ध्वजारोहण केले जाईल. पुढील नऊ दिवस ध्वज सायंकाळी ५ वाजता दररोज फडकावला जाईल. यात्रेदरम्यान दररोज सकाळी ६ ते रात्री ८ वाजेदरम्यान मराठी, इंग्रजी, हिंदी, कोकणी, तामीळ अशा पाच भाषांत प्रार्थना (मिस्सा) होईल. त्यासाठी दोन बिशप व २६ प्रवचनकार धर्मगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रार्थनेदरम्यान १, ४ व ७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता समितीमार्फत मातेच्या पालखीची परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येईल. ४ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता ईस्ट इंडियन ख्रिस्तींची मराठी बोलीभाषेत विशेष प्रार्थना होईल. ८ सप्टेंबरला शेवटच्या दिवशी दिव्य सोहळ्यासाठी बिशप वॉस्को पेन्हा उपस्थित राहतील.
मागील वर्षी १४ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रीय ख्रिस्तशरीर संमेलन, २२ मे रोजीच्या जपमाळमातेचा मनोरा या सुंदर वास्तुशिल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला देशातील अनेक राज्यांतील भक्तांनी येथे हजेरी लावली होती. तसेच पोप यांच्या दूतांनीही या तीर्थमंदिराला अनेकदा भेटी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
१२० वर्षांपासून वास्तव्य
१२० वर्षांपासून मीरा-भार्इंदरमध्ये ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाज वास्तव्यास आहे. त्यांनी अद्याप आपली मराठी मायबोली जपली आहे. मूळ मासेमारी व भातशेतीचा व्यवसाय असलेला हा समाज कालांतराने इतरत्र विखुरला गेला. परंतु, आजही उत्तनसह पश्चिम किनारपट्टीवर हा समाज आपले अस्तित्व टिकवून आहे.