खाचरातील भातरोपे कुजली

By admin | Published: July 23, 2015 04:15 AM2015-07-23T04:15:04+5:302015-07-23T04:15:04+5:30

पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये

Bhatrope Kujali in the Hauk | खाचरातील भातरोपे कुजली

खाचरातील भातरोपे कुजली

Next

वसई : पावसाने महिनाभर दडी मारल्यानंतर २ दिवसांपूर्वी पुन्हा जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे भाताची रोपे आडवी झाली. महिनाभर पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खाचरात पाणी साचून राहिल्यामुळे भाताची रोपे कुजण्याची भीती व्यक्त होत आहे.
दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, अनेक भागांत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे नुकसानही होण्याची भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. पावसाने आता थोडी उसंत घेतली तरच, भातशेतीची पुढील कामे करण्यासाठी शेतकरीवर्ग सज्ज होऊ शकेल. गेल्या २४ तासांत उपप्रदेशात वसई येथे २०० मिमी, मांडवी- १८७ मिमी, विरार- १४९ मिमी, आगाशी- ९५ मिमी, माणिकपूर व निर्मळ प्रत्येकी - १७६ मिमी पाऊस झाला.
गेल्या १९ जूनला अशीच मुसळधार वृष्टी झाली होती. त्यानंतर, मात्र पावसाने काढता पाय घेतला होता. यंदाही संपूर्ण महिना कोरडा गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. महिनाभर पाऊस न झाल्यामुळे सुका दुष्काळ निर्माण होतो की काय, अशी भीती वाटत असतानाच गेल्या ३ दिवसातील मुसळधार वृष्टीमुळे शेतकरीवर्गात आता ओला दुष्काळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पालघर : भरपावसात मोटारसायकलवरून पालघरला कामावर जात असताना कडूनिंबाचे झाड अंगावर कोसळून झालेल्या अपघातात प्रकाश माळी (४५), रा. सातपाटी हे जागीच ठार झाले. शिरगाव, आंबेडकरनगरजवळील रस्त्याच्या कडेला झालेल्या अपघाताची सातपाटी पोलिसांनी नोंद केली आहे.
सातपाटीच्या शेगटपाड्याजवळ राहणारे प्रकाश माळी आज सकाळी ९ च्या दरम्यान पालघरमधील आनंदाश्रम कॉन्व्हेंट स्कूलच्या पाठीमागे असलेल्या औद्योगिक परिसरातील एका कारखान्यात जात होते. त्यांची मोटारसायकल शिरगावच्या आंबेडकरनगरजवळ आली असताना एका खाजगी बागायतदाराच्या बागेत असलेले कडूनिंबाचे झाड रस्त्यावर कोसळले. त्याखाली
सापडून प्रकाश माळी यांचा मृत्यू झाला.
तलासरी : तालुक्यातील मौजे गिरगाव-आरजपाडा येथील एका आदिवासी शेतकऱ्याचा नदीकिनारी कोसळलेल्या दरडीखाली दबल्याने मृत्यू झाला. तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा हा पहिला बळी ठरला आहे. तलासरी तहसीलदार गणेश सांगळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गिरगाव येथून वाहत जाणारी वरोळी नदी व तिला येऊन मिळणारा गावातील ओढा, या ठिकाणी गिरगाव-आरजपाडा येथील आदिवासी शेतकरी नवशा हरजी ठाकरे (५५) शेतीकामासाठी गेले असता नदीकिनाऱ्याची मातीची दरड कोसळल्याने त्या दरडीखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सतत दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे नदी व ओहोळांना पूर आल्याने नदीकिनाऱ्यांलगतची माती वाहून गेल्याने किनाऱ्यांलगतची जमीन भुसभुशित झाल्याने हा अपघात घडला.
विक्रमगड : तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाच्या पुनरागमनामुळे भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यात १६५८ हेक्टरवर भातलागवड केली जात असून काही शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी तुंबल्याने भातलावणीचाही खोळंबा झाला आहे. तालुक्यात सरासरी ९३ मिमी पावसाची नोंद झाली असून विहिरी, नाले, नद्या तुडुंब भरले आहेत. पूरपरिस्थिती नसून जनजीवन सुरळीत आहे. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत लावणीची ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला.
कासा : डहाणू तालुक्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पेठजवळील सूर्या नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सूर्या नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे पेठजवळील सूर्या नदीवरील बंधारा पद्धतीचा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे परिसरातील उर्से, पेठ, म्हसाड, आंबिवली, साये, नानिवली, धामटणे आदी गावांतील संपर्क तुटला होता. त्यामुळे बोईसरकडे जाणाऱ्या नागरिकांना व चाकरमान्यांना १० किमी जास्त अंतर पार करून चारोटीमार्गे जावे लागते. या पुलाची उंचीही कमी आहे तसेच तो अरुंद आहे. त्यामुळे उंची व रुंदी वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Bhatrope Kujali in the Hauk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.