'...तर विजय मल्ल्या जन्मालाच आला नसता'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 05:40 PM2019-01-20T17:40:16+5:302019-01-20T17:40:21+5:30
विजय मल्ल्या देशातील पैसा लुटून पार्ट्या झोडत होता, त्याच वेळी देशात कठोर कायद्यांची अंमलबजावणी झाली असती तर विजय मल्ल्यासारखे जन्मालाच आले नसते, असे प्रतिपादन राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी रविवारी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधन आयोजित सुशासन संगम या राष्ट्रीय परिसंवादात केले.
भाईंदर - विजय मल्ल्या देशातील पैसा लुटून पार्ट्या झोडत होता, त्याच वेळी देशात कठोर कायद्यांची अंमलबजावणी झाली असती तर विजय मल्ल्यासारखे जन्मालाच आले नसते, असे प्रतिपादन राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी रविवारी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधन आयोजित सुशासन संगम या राष्ट्रीय परिसंवादात केले.
सध्याच्या मोदी सरकारच्या पारदर्शक कारभावर ‘मन की बात’ शासनावर आयोजित दोन दिवसीय परिसंवादाचे ते उद्घाटक म्हणून बोलत होते. गेल्या ७० वर्षांत देशात ठोस सुशासन होत नव्हते, त्यामुळे देशाच्या गंगाजळीतून होणारे सुमारे ९० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान थांबले नाही. ते थांबले असते तर आज भारत देश सर्वात पुढे गेला असता असा दावा त्यांनी केला. आर्थिक गळतीमुळेच भारताला सोने गहाण ठेवावे लागल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मनी लॉड्रींग, रेरासाठी २०१४ पासून कठोर कायद्यांची अंमलबजावणी होऊ लागल्याने यंदा देशातील पैसा परदेशात जाण्याचे प्रकार बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. रेरामुळे लोकांना निश्चित मुदतीत घरे मिळू लागली. भारत हा सर्वाधिक आयात करणारा देश असून भविष्यात तो बदलणार असल्याचा दावा त्यांनी केला.
भारतातील रेल्वेचे चित्र बदलत आहे. ते यापूर्वीच बदलले असते तर भारत रेल्वेच्या बाबतील चीनपेक्षा अधिक विकसित ठरला असता, असेही त्यांनी सांगितले. देशात कर चुकवेगिरीवर टीका करीत त्यांनी देशात अनेक परदेशगमन करणाऱ्यांसह कार खरेदी करणारे करोडपतीच असल्याचा दावा त्यांनी केला. हे करोडपती मात्र देशाच्या विकासासाठी कर भरताना चुकवेगिरी करत असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे अनेक गव्हर्नर अर्थतज्ज्ञ असतानाही त्यांनी यापूर्वीच्या सरकारांच्या आर्थिक गळतीच्या धोरणाबाबत कोणतेही सल्ले दिले नाहीत.
ते दिले असते तर देश कंगाल झाला नसता असा दावा करुन त्यांनी मन की बात च्या माध्यमातून थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला. दरम्यान त्यांनी सावध भूमिका घेत महात्मा गांधींसह जवाहरलाल नेहरु व राहूल गांधींचा भाषणात उल्लेख करुन त्यांच्या मर्यादित सुशासनाची सुद्धा त्यांनी प्रशंसा केली. गेल्या ७० वर्षांत देशाला लागलेली आर्थिक गळती २०१४ पासून बंद होण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट करीत भविष्यात त्यात आणखी प्रगती होणार असल्याचा दावा त्यांनी केला. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सुशासन संगमासाठी खाजगीपणासह सामूहिकपणात समतोल साधणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
व्यावसायिकेततून मानवता व प्रामाणिकपणा शोधल्यास सुशासन संगम साधता येत असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक विज्ञानासह शासकतेचा मेळ जसा साधला जातो तसाच मेळ अन्न व स्वातंत्र्यात साधणे आवश्यक आहे. केवळ स्वातंत्र्यामुळे पोट भरत नाही. त्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. यांचा समतोल साधल्यानंतरच सुशासन संगमाची प्रचिती येत असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसंवादावेळी प्रबोधिनीचे संचालक रविंद्र साठे, अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, कार्यकारी सदस्या रेखा महाजन, अरविंद रेगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पोखरणा यांनी केले.