भाईंदरच्या डंपिंगची आग आटोक्यात पण धूर निघणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 08:17 PM2023-02-19T20:17:03+5:302023-02-19T20:18:15+5:30
शनिवारी रात्री उत्तनच्या डंपिंगवर गेल्या अनेकवर्षां पासूनच कचरा प्रक्रियेविना पडून असून तेथे कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डंपिंग ग्राउंड मध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याच्या डोंगराला शनिवारी रात्री लागलेली आग रविवारी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश मिळाले आहे . मात्र आग अजूनही आत मध्ये धुमसत असून धुराचे लोट निघत असल्याने आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत .
शनिवारी रात्री उत्तनच्या डंपिंगवर गेल्या अनेकवर्षांपासूनच कचरा प्रक्रियेविना पडून असून तेथे कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे. ह्या कचऱ्याच्या डोंगरास सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असल्याने घातक धूर व प्रदूषणाने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत .
शनिवारी रात्री लागलेली आग भीषण असल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ८ अग्निशमन बंब , सुमारे ६ टँकर व सुमारे ४० अधिकारी आणि जवानांनी रात्रभर आग विझवण्यासाठी प्रयत्न चालवले होते. पाण्याचे सुमारे ६० पेक्षा जास्त टँकर आता पर्यंत आग विझवण्यासाठी मारण्यात आले आहेत असे सांगण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, पालिका उपायुक्त मारुती गायकवाड व रवी पवार, अतिरिक्त शहर अभियंता व घनकचरा प्रकल्प विभागाचे प्रमुख सुरेश वाकोडे, अग्निशमन मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे, अग्निशमन केंद्र अधिकारी जगदीश पाटील व दिलीप रणवरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन आगीची पाहणी करत आढावा घेतला.
आग आटोक्यात आली असली तरी कचऱ्याच्या डोंगराच्या आतील भागातील आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही . जेणे करून मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे . आग पूर्णपणे विझवण्यासाठी पोकलेन व जेसीबीने कचरा विस्कळीत करून पाणी मारले जात आहे . रविवारी सायंकाळ पर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान आग पूर्णपणे विझवण्याच्या कामात गुंतलेले होते .
कचऱ्यातुन मिथेन वायू निर्माण होत असल्याने आग लागत असल्याचा दावा प्रशासना कडून केला जात आहे . तर कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी आगी लावल्या जातात . येथे अनेक वर्षांचा प्रक्रिया न करता बेकायदा टाकलेला कचरा असून मिथेन वायूचे कारण पुढे करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कमी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत