आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण
By धीरज परब | Published: March 1, 2024 06:09 PM2024-03-01T18:09:24+5:302024-03-01T18:09:37+5:30
भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुशीलकुमार पवार ( ३४ ) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशा नुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते.
मीरारोड - एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ओळख पटलेल्या अल्पवयीन आरोपीचा शोध घेण्यास आलेल्या भाईंदर पोलीस ठाण्यातील दोघा पोलिसांना भाईंदरच्या गणेश देवल नगर झोपडपट्टीत एकाने ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुशीलकुमार पवार ( ३४ ) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशा नुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. बावन जिनालय जैन मंदिर मागे डॉ. बाबासाहेब आंबडेकर ६० फुटी मार्गावरील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये अंदाजे १६ ते १७ वर्षांचा दुचाकी चोरी करणारा संशयित दिसून आला.
फुटेज वरून त्याची माहिती घेतली असता पोलीस हे गणेशदेवल नगर मधील गल्ली क्र. २ मी तिवारी चाळीत बुधवारी रात्री गेले होते. फुटेज मधील संशियताची खात्री पटल्याने त्याला ताब्यात घेत असताना त्याठिकाणी अयोध्या मिश्रीलाल गुप्ता मूळ रा. गाझीपूर , उत्तरप्रदेश हा आला. त्याने आरडाओरडा करत गल्लीतील लोकांना गोळा केले. पोलिसांच्या आरोपी नेण्याच्या कामात अडथळा आणून पवार यांना शिवीगाळ करत त्यांची कॉलर धरली. त्यांना धक्काबुक्की करत चापटाने व बुक्क्यांनी मारहाण केली. शिपाई सलमान पटवे हे पुढे आले असता त्यांना देखील पोटात बुक्के मारून ढकलून दिले. पोलिसांना अर्वाच्च शिव्या देत अरेरावी केली.
पवार यांनी बीटमार्शल रवींद्र वाघ व श्रीराम वीर यांना कॉल करून बोलावून घेतले. ते आल्या नंतर अयोध्या गुप्ता ह्याला ताब्यात घेऊन २८ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा गुन्हा दाखल करत अटक केली. पोलिसांवर झालेल्या ह्या हल्ल्याने पोलीस वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.