भार्इंदर पालिकेने केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:27 AM2018-07-22T00:27:17+5:302018-07-22T00:27:43+5:30

कुठलीही पायवाट नसताना चक्क तीन मीटरची पायवाट असल्याची खोटी माहिती सरकारला देऊन कांदळवन, पाणथळ व सीआरझेड क्षेत्रातून १८ मीटरच्या रस्त्याची मंजुरी मागणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेला चपराक बसली आहे.

Bhinder Palike has done fraud | भार्इंदर पालिकेने केली फसवणूक

भार्इंदर पालिकेने केली फसवणूक

Next

मीरा रोड : कुठलीही पायवाट नसताना चक्क तीन मीटरची पायवाट असल्याची खोटी माहिती सरकारला देऊन कांदळवन, पाणथळ व सीआरझेड क्षेत्रातून १८ मीटरच्या रस्त्याची मंजुरी मागणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेला चपराक बसली आहे. नगररचना विभागाने रस्त्याचा फेरबदल नियोजनाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे स्पष्ट केल्याने सरकारने पालिकेचा प्रस्ताव फेटाळला आहे.
भार्इंदर पश्चिमेस जयअंबेनगर, बजरंगनगर, क्रांतीनगर, गणेश देवलनगर, शास्त्रीनगर व नेहरूनगर या सरकारी जागेत महापालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संगनमताने सीआरझेड, कांदळवन, पाणथळ व नाविकास क्षेत्रात बेकायदा झोपड्या व बांधकामे उभी राहिली आहेत. या वस्त्यांना पालिकेने सर्व सुविधा पुरवलेल्या आहेत. महापालिका मुख्यालयामागेच या झोपडपट्ट्या वाढल्या आहेत.
पालिका मुख्यालयामागील नेहरूनगर, शास्त्रीनगर, नाझरेथ चर्च मैदानामागून मोतीनगर, क्रांतीनगर व गणेश देवलनगर अशी तीन मीटरची पायवाट असल्याचा जावईशोध महापालिका व लोकप्रतिनिधींनी लावला. या पायवाटेच्या जागी चक्क १८ मीटर रुंद रस्ता विकास आराखड्यात मंजूर करावा, असा फेरबदलाचा प्रस्ताव महापालिकेने मे २०१४ मध्ये पाठवला होता.
परंतु, याप्रकरणी सरकारनेच चौकशी केल्यावर तसेच संचालक, नगररचना यांचा सल्ला घेतल्यावर या रस्त्याला मंजुरी देणे नियोजनाच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्याचे सरकारने स्पष्ट करत महापालिकेचा प्रस्ताव फेटाळला. नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी अशोक खांडेकर यांनी तशी अधिसूचना काढली आहे. वास्तविक, या ठिकाणी पायवाट नसून उलट पालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने बेकायदा भराव करून झोपड्या उभ्या राहत आहेत. येथील जमीन ही सरकारी असून पाणथळ, कांदळवन व सीआरझेड आहे.

पालिकेकडूनच ऱ्हास
मुळात ही सर्व वस्तुस्थिती सरकारपासून लपवून महापालिकेने पर्यावरणाचा ऱ्हास करत बेकायदा झोपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सर्व खटाटोप चालवल्याचा आरोप सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी केला आहे. तर, पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी मात्र या प्रस्तावाची माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.

Web Title: Bhinder Palike has done fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.