भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 10:53 PM2019-11-06T22:53:47+5:302019-11-06T22:54:04+5:30

महिनाभरात पाच जणांचा बळी : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू

Bhiwandi-Wada-Manor Highway Death Trap | भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा

भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा

googlenewsNext

वसंत भोईर

वाडा : भिवंडी - वाडा - मनोर हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून पाच वर्षांमध्ये झालेल्या अपघातात तब्बल ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे; तर अनेकजण जखमी झाले आहेत. खराब रस्ता, जागोजागी खड्डे, अपूर्ण काम यांमुळे हे अपघात होत असल्याचे सांगितले जाते.

मुंबई - अहमदाबाद आणि मुंबई - आग्रा या प्रमुख दोन रस्त्यांना जोडणारा दुवा म्हणून भिवंडी - वाडा - मनोर हा रस्ता ओळखला जातो. या महामार्गावरील वाढती वाहतूक तसेच वाड्यातील औद्योगीकरण लक्षात घेता राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी दिली. हे रस्त्याचे काम ‘बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कंपनीने पाच वर्षांत हे रस्त्याचे काम पूर्ण केले नाही. १६ कि.मी. अंतरावर वन विभागाच्या जागेत हा रस्ता अद्यापही दुपदरीच आहे तर देहजे, पिंजाळ नद्यांवरील पुलांची कामेही अपूर्ण आहेत.
वाडा ते मनोर हा रस्ता बालाजी कंपनीने चांगला बनवला आहे. मात्र वाडा ते भिवंडी हा ४० कि.मी. अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून प्रत्येक पावसात तो खड्डेमय होताना दिसतो. त्यावर थातूरमातूर डागडुजी केली जाते. पुन्हा पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच स्थिती होते. या रस्त्याच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी पाच वर्षात अनेक आंदोलने झाली. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने आजही निष्पाप लोकांचे जीव जात असून संसार उघड्यावर पडले आहेत. यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, जिजाऊ सामाजिक संघटनेचे नीलेश सांबरे, श्रमजीवी संघटना, स्वाभिमान संघटना, मनसे यांनी अनेक वेळेला आंदोलने करून समस्येकडे लक्ष वेधले होते. पण आश्वासनांपलीकडे काहीही पदरात पडलेले नाही. नागरिकांचे हाल सुरूच आहेत. वास्तविक, न्यायालयाने सहा महिन्यात हा रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत. त्या सहा महिन्यातीलही अडीच महिने आता निघून गेले आहेत.
सद्यस्थितीत हा रस्ता सुप्रीम कंपनीकडून काढून घेतला असून टोलवसुली सुद्धा बंद आहे. या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. ते काम देखील कासवगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होत आहे.

काँक्रिटीकरणाचे काम सुरू
च्१५० मीटर रस्त्याच्या कामासाठी पाच महिने गेले. कंचाड फाटा येथे एकशे पन्नास मीटर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. एप्रिल महिन्यात हे काम सुरू करण्यात आले पण आजपर्यंत ते पूर्ण झालेले नाही.

राज्य महामार्गावर पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल
- प्रकाश पातकर,प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा

Web Title: Bhiwandi-Wada-Manor Highway Death Trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.