मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे होणार भूमीपूजन; पावसामुळे प्रशासनापुढे आव्हान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 09:33 AM2024-08-26T09:33:34+5:302024-08-26T09:34:16+5:30
२७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे.
पालघर : वाढवण बंदराच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्ट रोजी पालघर येथे येणार असल्यामुळे त्यांच्या सभेसाठी बनविण्यात आलेला मंडपाचा एक भाग पहाटे आलेल्या वादळी वारा आणि तुफान पावसात उडून रस्त्यावर पडल्याचे दिसून आले. २७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळी वारे याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने ३० ऑगस्टचा पंतप्रधानांचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान शासन आणि प्रशासनापुढे उभे राहिले आहे.
केंद्र शासनाच्या बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत वाढवण बंदराचे भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० ऑगस्ट रोजी पालघर येथे येत असून त्यांच्यासोबतच राज्यपाल सीपी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय बंदर मंत्री सदानंद सोनोवाल केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर केंद्रीय मत्स्यपालन पशुसंवर्धन राज्यमंत्री एस पी सिंग बघेल केंद्रीय मत्स्यपालन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला सुमारे ५० हजार लोक येणार असल्याचे अपेक्षित असून १००० वाहने येणार असल्याच्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासन सर्व व्यवस्था करण्यात युद्ध पातळीवर साशंकता व्यक्त केली जात आहे मात्र मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यांच्या अनेक अडचणी ह्या कामांमध्ये येत असल्याने ३० ऑगस्ट पर्यंत हेच काम पूर्ण होईल का? ह्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
सोमवारी पहाटे पाच वाजता जोरदार वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू असताना मंडपाच्या लोखंडी साहित्याचा भाग उडून सुमारे २०० फूट लांब पालघर- बोईसर रस्त्यावर येऊन पडला. ह्या लोखंडी साहित्यामुळे पालघर बोईसर रस्त्यावरची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती मात्र तीन तास उलटून गेल्यानंतरही हे साहित्य रस्त्यावरून बाजूला करण्यात आले नसल्याचे दिसून आले.