वसईत नाशिकची पुनरावृत्ती टळली; ऑक्सिजन प्लांटमधील गळती वेळीच रोखली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 16:16 IST2022-01-16T16:03:09+5:302022-01-16T16:16:14+5:30
Oxygen plant leakage : सर्व ऑक्सिजन हवेतच मिसळला आणि मोठी दुर्घटना टळली

वसईत नाशिकची पुनरावृत्ती टळली; ऑक्सिजन प्लांटमधील गळती वेळीच रोखली
आशिष राणे
वसई - येथील ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटल व त्याठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यासाठी मागील वर्षी पालघर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी सक्षम आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करीत वसईतील जी जी कॉलेजमध्ये कोविड रुग्णालय व सोबत ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली होती.त्यासाठी याठिकाणी दोन मिनी ऑक्सिजन प्लांट ही बसविण्यात आले होते. मात्र, याच मिनी ऑक्सिजन प्लांट ला रविवारी (दि.१६ ) सकाळी ९ च्या सुमारास अचानक गळती सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही गळती झाल्यानंतर महसूल विभागाची एकच धावपळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात वसई प्रांताधिकारी यांना संपर्क केला असता तो झाला नाही. नशीब बलवत्तर म्हणून सदरचा ऑक्सिजन गळती प्रकाराची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांना समजताच त्यांनी जरा ही विलंब न करता तात्काळ खबरदारी घेत ऑक्सिजन संदर्भात तांत्रिकदृष्ट्या देखभाल दुरुस्ती करणारे इलेक्ट्रिशनची टीम घेऊन घटनास्थळ गाठलं व या सिलेंडर मधील ही गळती थांबवली.
दरम्यान मागील चार ते पाच महिन्यापासून हे कोविड सेंटर रुग्णालय बंद स्थितीत असून याठिकाणी मात्र ऑक्सिजन मिनी प्लांट जैसें थे स्थितीत होता. मात्र अचानकपणे दोन्ही मिनी प्लांटमधून गळती झालेला हा ऑक्सिजन हवेतच मिसळून गेल्याने वसईतील मोठी दुर्घटना घडता घडता राहिली असल्याचा दावा महसूल प्रशासनाने केला आहे.