पालिका उमेदवारीसाठी बविआमध्ये मोठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:14 AM2021-01-08T01:14:34+5:302021-01-08T01:14:40+5:30
आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणूक
प्रतीक ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : वसई-विरार महानगरपालिका परिवहन सेवा उद्घाटनाच्या निमित्ताने वसई-विरार महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ अप्रत्यक्ष फुटला आहे. बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पालिकेच्या नवीन परिवहन सेवेचा शुभारंभ केल्यानंतर शिवसेनेने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सेवेचे रीतसर उद्घाटन करून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, सत्ताधारी बहुजन विकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळत आहे.
वसई-विरार महापालिका निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यांत लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिवहन सेवा उद्घाटनाच्या निमित्ताने याची चिन्हे राजकीय आखाड्यात दिसून आली आहेत. वसई-विरार महापालिकेच्या बहुतेक सर्वच प्रभागांत आरक्षण बदलले असल्याने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या तुलनेत बविआची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे या पक्षाची उमेदवारी देताना खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे बविआ नेतृत्व जुन्या-जाणत्या नेत्यांना इतर प्रभागांत संधी देत त्यांचे पुनर्वसन करते की, त्या प्रभागात कार्यरत जुन्या तरुण कार्यकर्त्यांना
संधी देण्याचा निर्णय घेते, याकडे बविआतील नेत्यांसह वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.
वसई-विरार महापालिकेत १०९ नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे तर अन्य पक्षाचे अवघे सहा नगरसेवक होते. मागील वर्षी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण होते. या वेळीदेखील हे आरक्षण कायम असले, तरी
प्रभाग आरक्षण मात्र बदलले
आहे.
विशेष म्हणजे ज्या माजी नगरसेवक अथवा नगरसेविकेचे प्रभाग आरक्षण बदलले आहे, ज्यांना बविआने एखादी तरी संधी यापूर्वी दिली आहे, अशा कुणाही प्रभाग बदललेल्या माजी नगरसेवक अथवा नगरसेविकेने इतर प्रभागांत आपला शिरकाव करून घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रत्येक प्रभागातील पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
असे प्रभाग बदललेले माजी नगरसेवक-नगरसेविका किमान एक टर्म 'नगरसेवक' या पदाशिवाय केवळ पक्ष कार्यकर्त्याच्या भूमिकेत कितपत कार्यरत राहू शकतात, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.