तारापूरमध्ये सर्वात मोठा प्रकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:56 PM2019-12-31T23:56:13+5:302019-12-31T23:56:24+5:30
सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण; दुसरा टप्पाही लवकरच कार्यान्वित करणार
- पंकज राऊत
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेच्या विस्तारित सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) २५ एमएलडी क्षमतेच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मंगळवारी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. उर्वरित २५ एमएलडीचा दुसरा टप्पाही लवकरच कार्यान्वित होणार असून जुना व नवा मिळून तारापूरच्या सीईटीपीची एकूण क्षमता ७५ एमएलडी होणार असल्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी देशातील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत ठरणार आहे.
तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस) या संस्थेने राज्यातील सर्वात मोठ्या तारापूर एमआयडीसीमध्ये सुमारे १२० कोटी रुपये खर्च करून ५० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभरल्याने औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या सुरू असलेल्या २५ एमएलडी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (सीईटीपी) या नव्या ५० एमएलडी सांडपाणी प्रक्रि या प्रकल्पाची जोड मिळणार असल्याने किमान जलप्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे.
तारापूर येथे सध्या कार्यान्वित असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता अवघी २५ एमएलडी असून त्याच्या क्षमतेच्या दुप्पट रासायनिक प्रदूषित सांडपाणी या प्रक्रि या केंद्रात येत असल्याने अनेक वेळा या प्रक्रि या केंद्रातून प्रक्रि या न करताच ते अतिरिक्त सांडपाणी सरळ नवापूरच्या खाडीत सोडले जात होते. त्यामुळे त्याचा गंभीर परिणाम नवापूरसह दांडी, नांदगाव, मुरबे इत्यादी खाडी किनाºयावर मासेमारीबरोबरच पर्यायाने मच्छिमार, तसेच शेती-बागायतीवर होत होता. यामुळे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली असून यासंदर्भात सुनावण्या सुरू आहेत, तर जमीन कंत्राट खर्चावरील आक्षेप इत्यादी अनेक अडथळ्यांमुळे या केंद्राच्या उभारणीस मर्यादेपेक्षा जास्त विलंब झाला. त्या सर्वावर मात करून हा प्रकल्प आता उभा राहिल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने एक समाधान देणारी बाब आहे.
तारापूरच्या जलप्रदूषणाचा प्रश्न सुटणार : या कार्यक्रम प्रसंगी तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटीचे संचालक मंडळ प्रकाश पाटील, अशोक सराफ, डी.के. राऊत, सदाशिव शेट्टी, पवन पोद्दार, चरणप्रीत आहुजा, गुरुबक्ष सिंग, राजेंद्र गोळे व रामकी एन्व्हायर्नमेंट सर्व्हिसचे बॉबी कोरियन यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक व उद्योजकांचे प्रतिनिधी तसेच टीमाचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विस्तारित ५० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कार्यप्रणालीची माहिती समजून घेऊन पाहणी केली. या वेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित संचालक मंडळाच्या पदाधिकाºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उभारण्यात आलेल्या या केंद्राची प्रशंसा करून या केंद्रामुळे तारापूरच्या सांडपाण्याच्या प्रदूषणात निश्चित सुधारणा होईल, असे सांगितले.
विस्तारित सीईटीपीची वैशिष्ट्ये
प्रकल्प क्षमता : ५० एमएलडी
मे २०२० पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा संकल्प
प्रकल्प किंमत : सुमारे रु. १२० कोटी
उद्योजकांचा सहभाग : रु. १०८ कोटी
(४८ कोटी प्रत्यक्ष+६० कोटी सारस्वत बँक कर्ज )
अद्ययावत प्रक्रि या व्यवस्था
१२.५ एमएलडी प्रक्रि या करणारे चार मॉड्युल्स (युनिट)
प्रकल्पाला नीरी, आयआयटी (मुंबई), एमआयडीसी, एम.पी.सी.बी. यांच्याकडून मान्यता
द्विस्तरीय डिफ्युज एअर फ्लोटेशन (डॅफ) तंत्रज्ञानाचा वापर
अमोनियाकल नायट्रोजन निर्मूलनासाठी आॅनॉक्सिक प्रक्रिया पद्धत अंतर्भूत
गाळा काढण्यासाठी द्विस्तरीय प्रक्रि या पद्धत
जैविक व रासायनिक गाळ निर्मूलनाकरिता आवश्यक व्यवस्था
ऊर्जा कार्यक्षम असणारी टर्बो ब्लोअर व्यवस्था
संगणकीकृत, आॅनलाइन देखरेख पद्धती
प्रकल्प परिसरात हरितपट्टा निर्माण होण्यासाठी २० हजार झाडांची लागवड
विजेची गरज ४ हजार अश्वशक्ती
अपेक्षित दरमहा प्रक्रि या खर्च : रु.१.५० कोटी
अपेक्षित शासकीय (राज्य व केंद्र सरकार) अनुदान रु.४५ कोटी
या केंद्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.