विरार विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेस अग्निशमनदलाचे प्रमुख जबाबदार, भाजपाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:31 PM2021-04-25T16:31:42+5:302021-04-25T16:32:25+5:30
विरार येथील विजय वल्लभ आगीच्या दुर्घटनेस सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव याची तात्काळ हकालपट्टी करा. शासनाने समितीचा फेरविचार करावा, भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी.
आशिष राणे
वसई - संपुर्ण देश हादरून गेलेल्या घटनेत विरार मधील विजयवल्लभ या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भीषण आग लागून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेस सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा सहसंयोजक अशोक शेळके यांनी शासनाकडे केली आहे.
वसई विरार शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात अग्निसुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) करण्यासंदर्भात शेळके हे मागील दोन वर्षांपासून सातत्याने स्थानिक प्रशासनाकडे आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र ही बाब येथील स्थानिक प्रशासनाने कधीच गांभीर्याने घेतली नाही. वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांना यापूर्वी अनेक वेळा पत्र व्यवहार करून विनंत्या ही केल्या सोबतच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडूनही महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी लेखी निर्देश ही देण्यात आले. मात्र येथील ढिम्म प्रशासन केवळ हातावर हात धरून बसले.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेत 15 निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि यात मृतांचे कुटुंबीय, नातलग यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना इतकी भीषण होती की,यामुळे वसई-विरार शहरच नाही तर अवघ्या राज्य व केंद्रीय प्रशासन ही या घटनेमुळे गहिवरले. सर्वत्र देशभर याचे पडसाद उमटले व शोककळा पसरली. या घटनेनंतर मृतांच्या वारसांना शासनाकडून तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. परिणामी या घटनेनंतर विजय वल्लभ रुग्णालय प्रशासन, व्यवस्थापन, डॉक्टर, कर्मचारी आदी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ही दाखल करण्यात आला.
मात्र एवढे करून चालणार नाही तर या 15 रुग्णांच्या घटनेस जे कोणी प्रमुख जबाबदार आहेत त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत अशोक शेळके यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले आहे. याप्रकरणी राज्य शासनाने अग्निशमन विभागाची सखोल चौकशी करून आजपर्यत (फायर ऑडिट) का करण्यात आले नाही? यास जबाबदार असणाऱ्या अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे.
विजय वल्लभ रुग्णालय जळीत प्रकरणी गठीत केलेल्या समितीत दिलीप पालव पालव किंवा अन्य नावे पाहता ही नियुक्ती आम्ही स्थानिक पातळीवरच न्याय मागतोय अशी भावना होतेय. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ही समिती उच्चस्तरीय असणे गरजेचे आहे ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीश अथवा स्वतः सेवेतील आयपीएस पोलिस अधिकारी असावे किंबहुना तात्काळ या समिती मधून दिलीप पालव यांना काढून टाकले जावे - अशोक शेळके, युवा सहसंयोजक महाराष्ट्र प्रदेश, भटके-विमुक्त आघाडी
महाविकासआघाडी सरकारने समिती तयार केली मात्र या समितीत जिल्हा व पालिका हद्दीतील आस्थापना बाबत परवानगी,नियोजन पूर्तता व नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकारी वर्गास न्याय करण्यासाठी नियुक्त केले. हे हास्यास्पद असून यातून काही साध्य होणार नाही शासनाने पुन्हा नव्याने समिती गठित करण्याचा फेरविचार करावा किंवा समिती बाहेरची नेमून यात मा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असावा तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल जो अग्निशमन अधिकारी वसई विरार शहरांतील फायर ऑडीट बाबतीत मूग गिळून गप्प राहतो तो समितीत कसा ? - - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद
चौकशी समिती वादात; न्याय कसा मिळणार
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील भीषण आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी शासनाच्या वतीने पाच सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या या वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त झोन -2 संजयकुमार पाटील आणि वादग्रस्त महापालिका अग्निशमन दल प्रमुख अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. या समितीने 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करावयाचा आहे.