भाजपा, काँग्रेसमध्ये असे रंगले उमेदवारीचे नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:17 AM2018-05-15T03:17:04+5:302018-05-15T03:17:04+5:30
उमेदवारी देण्यासाठी अथवा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये मोठे नाट्य घडून आले. त्यामुळेच गावीत भाजपामध्ये गेलेत. तर सवरांचे पुत्राला खासदारकीची उमेदवारी देण्याचे स्वप्न भंग पावले.
- नंदकुमार टेणी
पालघर: उमेदवारी देण्यासाठी अथवा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये मोठे नाट्य घडून आले. त्यामुळेच गावीत भाजपामध्ये गेलेत. तर सवरांचे पुत्राला खासदारकीची उमेदवारी देण्याचे स्वप्न भंग पावले.
काहीही झाले तरी आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी दामू शिंगडा यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीत आणि मुंंबईत फिल्डिंग लावली होती. तर दुसरीकडे राजेंद्र गावीत यांचेही पारडे बऱ्यापैकी जड होते. त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? हा प्रश्न होता. नव्या दमाचा उमेदवार द्यायचा असेल तर माझ्या पुत्राला उमेदवारी द्या असे शिंगडा यांचे म्हणणे होते. उमेदवारी निश्चित करावयाच्या आदल्या दिवसापर्यंत गावीत यांना उमेदवारी मिळणार असे चित्र असल्याने शिंगडा यांनी थेट राहुल गांधी यांनाच साकडे घातले. आपले ज्येष्ठत्व आणि पक्षनिष्ठा व गांधी घराण्याप्रती असलेली निष्ठा या गोष्टी पटवून दिल्या आणि त्यातून शिंगडांची उमेदवारी निश्चित झाली. हे कळताच गावीत यांनी भाजपामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवायचे ठरवले व त्याप्रमाणे घडून आले.
भाजपामध्ये असेच पुत्रप्रेमाचे नाट्य रंगत होते. पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची भाजपाची उमेदवारी आपला सर्जन पुत्र हेमंत याला मिळावी, अशी विष्णू सवरा यांची इच्छा होती. त्यासाठी ते गळ टाकून बसले होते. ही पोटनिवडणुक आहे. निवड झालेल्या खासदाराची मुदत काही महिने असणार आहे. त्यामुळे नवा चेहरा भाजपाने आजमावून पहावा व त्यासाठी आपल्या पुत्राला उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्याला पक्षातूनच तीव्र विरोध होता. तुमच्या प्रभावाखाली असलेल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुमच्या हट्टासाठी तुमच्या कन्येला (निशा सवरा) उमेदवारी दिली तिला तुम्हाला विजयी करता आले नाही. या गावच्या नगरपंचायतीची निवडणूक जिंकता आली नाही. तुमचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड नगरपंचायतीच्या निवडणुकीतही तुम्हाला पक्षाला विजयी करता आले नाही तिथे विक्रमगड विकास आघाडी सत्तेवर आली. या पार्श्वभूमीवर तुमच्या पुत्राला उमेदवारी कशासाठी द्यायची?असे प्रश्न पक्षश्रेष्ठींनी विचारले. त्याचे कोणतेही उत्तर सवरांकडे नव्हते. त्यामुळेच मंत्रीपुत्राला उमेदवारी देण्यापेक्षा काँग्रेसमधून इम्पोर्ट केलेल्या गावीत यांना उमेदवारी देणे भाजपाने पसंत केले. त्यामुळे सवरांची पुत्रप्रेमाची खेळी अपयशी ठरली. शिवसेनेने वनगा यांना हायजॅक करून भाजपाचे नाक कापले होते. त्यामुळे गेलेली अब्रू काही प्रमाणात वाचविण्यासाठी भाजपाला अन्य पक्षातील मोठा मासा गळाला लावून दाखविणे भाग होते. त्यासाठी भाजपाने गावित यांना गळाला लावले. त्यामुळे उमेदवार पळवापळवीच्या खेळात आपण कमी नाही हे भाजपाला दाखवता आले.
>.हेमंत हे फारसे परिचित नाहीत. अंबाडी येथील नवजीवन रुग्णालयात ते आॅर्थोपेडीक सर्जन आहेत. त्यांचा पॉलेटिकल होल्ड नाही. पक्षकार्यात त्यांचे फारसे योगदान नाही. अशा स्थितीत त्यांना उमेदवारी कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते. अशी उमेदवारी मिळविण्यासाठी जी जबरदस्त फिल्डिंग स्थानिक, राज्य व केंद्र पातळीवर लावावी लागते ती ही लावण्यात सवरा अपयशी ठरले. या उमेदवार निश्चितीत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने व त्यांना गावीत यांनाच उमेदवारी द्यायची असल्याने गावितांचे पारडे जड ठरले.