भाजपा नेत्याच्या पत्नीचा दुस-यांदा मृत्यू
By Admin | Published: March 3, 2017 07:59 AM2017-03-03T07:59:10+5:302017-03-03T08:56:36+5:30
सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा 28 एप्रिल 2003 मध्ये मृत्यू झाला होता
>ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 3 - वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या पत्नीचा दुस-यांदा मृत्यू झाला आहे. आता हे कसं काय शक्य आहे असं विचारणार असाल तर स्वत: जिल्हाध्यक्षांनीच दोनवेळा पत्नीचं मृत्यूपत्र तयार करुन हे सिद्ध केलं आहे. तसं पाहायला गेलं तर वसई-विरार महानगरपालिका आणि येथील स्थानिक नेत्यांचं वादाशी यांचं जुनं नातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी लिखित तक्रार केली आहे.
वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्या पत्नीच्या मदतीने व्यावसायिक गाळा विक्री करण्यासाठी बोगस दस्ताऐवज आणि पहिल्या पत्नीचे मृत्यूचे खोटे दाखले सादर केले असून, याप्रकरणात महापालिका आणि दुय्यम उपनिबंधकही सहभागी झाले आहेत. तसेच सरकारचा लाखो रुपयांचा महसूलही बुडवल्याची तक्रार गोविंदा गुंजाळकर यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा 28 एप्रिल 2003 मध्ये मृत्यू झाला होता. ज्याचं प्रमाणपत्र महानगरपालिकेने दिलं होतं. मृत पत्नी सुवर्णा साटम यांच्या नावावर मौजे आचोळे येथे एक दुकान होतं. या दुकानाची किंमत जवळपास 34 लाख होती. सुभाष साटम यांनी खोटी कागदपत्रं तयार करुन कागदोपत्री पत्नीला जिवंत दाखवलं. त्यानंतर तिची संपत्ती विकून 15 ऑक्टोबर 2011 रोजी महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा मृत्यू प्रमाणपत्र तयार करुन घेतलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. गुंजालकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात लिखीत तक्रार दिली असून सुभाष साटम यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. मयत पत्नीला जिवित दाखवून हा व्यवहार करतांना साटम यांनी शासनाचीही आर्थीक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शासनाचा किमान दोन लाख रुपयांचा महसुल बुडवण्यात आला आहे. तर ३४ लाखांचा गाळा ३ लाखांना विक्री केल्याचे दाखवून साटम यांनी ३० लाख रुपयांचा अपहारही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.